अभिजित पोते, पुणे, दि. 15 फेब्रुवारी 2024 | पुणे कोथरुड मतदार संघात आमदार राहिलेल्या मेधा कुलकर्णी यांना भाजपने न्याय दिला. मागील विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांच्या कार्यकर्त्यांकडून काही वेळा नाराजी व्यक्त केली गेली होती. परंतु मेधा कुलकर्णी यांनी जाहीरपणे कधी नाराजी व्यक्त केली नाही. त्यामुळे त्यांना एकनिष्ठतेचे बक्षीस दिले. आता थेट राज्यसभेसाठी संधी त्यांना दिली आहे. यामुळे पुणे लोकसभेची गणिते बदलणार आहेत.
राज्यसभेसाठी पुण्यातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन ब्राम्ह्यण मतदारांची नाराजी दूर केली आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे मतदार संघातून भाजप आता मराठा उमेदवार देण्याची शक्यता जास्त आहे. आगामी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे. या सर्व इच्छुकांनी गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेसाठी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे.
भाजपने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन नाराज झालेल्या ब्राह्मण समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कुलकर्णी यांना राज्यसभेसाठी संधी दिल्याने पुणे लोकसभेची गणिते आता बदलणार आहेत. पुणे लोकसभेतून ब्राह्मण उमेदवार गिरीश बापट खासदार होते. त्यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली नाही.
परंतु कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने लढवली. यावेळी ब्राह्मण उमेदवार दिला नाही. हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यांचा पराभव रवींद्र धंगेकर यांनी केला होता. कारण नाराज झालेला ब्राह्मण समाज रासने यांच्या पाठिशी उभा रहिला नाही. आता मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिल्यामुळे ब्राह्मण समाजाची नाराजी दूर झाली आहे.