पुणे – गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे (vasant more) हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray)शनिवारच्या अयोध्या (Ayodhya)दौऱ्याबाबतच्या ट्विटनंतर अडचणीत सापडले होते. मात्र रविवारी राज ठाकरेंशी त्यांच्या झालेल्या भेटीनंतर त्यांनी या प्रकरणात स्पष्टीकरण दिले आहे. राज ठाकरे यांच्याशी २५ मिनिटांची भेट झाल्याचे सांगत, ही भेट हेच अनेकांना उत्तर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंचे कालचे ट्विट आपल्याबद्दल नव्हते, हेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या काहीही झालं की सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा संबंध आपल्याशी जोडण्यात येतो, असेही मोरे म्हणाले. कुणाच्या पोटात, किंवा गोटात काय आहे हे आपल्याला माहित नसल्याचेही त्यांनी सांगितले. १६ वर्षे आपण मनसेत आहे, त्यामुळे साहेबांबद्दल काहीही वाईट बोललेलं ऐकून घेणार नाही, हेही आपण राज ठाकरेंना सांगितल्याचं मोरेंनी स्पष्ट केलं. यापुढे अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरेच बोलतील, आपण काहीही बोलणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उ. प्रदेशातील भाजपचे अयोध्येचे खासदार ब्रूजभूषण सिंग यांनी विरोध केला आहे. परप्रांतियांच्या वादाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी माफी मागावी, त्यानंतर त्यांना अयोध्येत विमानतळावर उतरु देऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांनी याबाबत उ. प्रदेशात जनआंदोलन सुरु केले आहेत. त्यांना उत्तर देताना वसंत मोरे यांनी दुपारी त्यांच्या अशा भूमिकेमुळे राज्यातील त्यांच्या बांधवांना अडचणीत टाकत आहेत, असे उत्तर वसंत मोरेंनी दिले होते.
त्यानंतर शनिवारी संध्याकाळी राज ठाकरे यांनी पत्रक काढून अयोध्येच्या प्रकरणात आपल्याशिवाय कोणत्याही मनसेच्या पदाधिकाऱ्याने बोलू नये असे आदेश काढले होते. वसंत मोरे यांच्या महाआरतीकडेही राज ठाकरेंनी पाठ फिरवली होती. त्यामुळे वसंत मोरेंमुळेच राज ठाकरेंनी पत्रक काढले अशी चर्चा सुरु झाली होती. दरम्यान महाआरतीवेळीही वसंत मोरे यांनी ४ तारखेला सेनापती गायब होते, महाराष्ट्र सैनिक वाऱ्यावर होते, अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. त्यानंतर रविवारी वसंत मोरे यांची राज ठाकरेंशी भेट झाली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी
आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/Yf7spS4ccn— Raj Thackeray (@RajThackeray) May 7, 2022
शनिवारी पुण्यात वसंत मोरे यांनी महाआरतीचे आयोजन केले होते. त्याच्या नियोजनाबद्दल राज ठाकरे यांनी आपले कौतुक केल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले आहे. शनिवारच्या महाआरतीवेळी जसे नियोजन झाले, तसे ४ तारखेला पुणे शहरात पदाधिकाऱ्यांनी नियोजन केलं असतं तर आठही विधानसभा मतदारसंघात महाआरती झाली असती, पण पदाधिकारी ग्राऊंडवर नव्हते, मनसैनिक होते हे राज ठाकरेंना सांगितल्याचेही त्यांनी सांगितले. वसंत मोरे हे १५ वर्एषांपासून मनेसेचे पुण्यातील प्रमुख नेते आणि नगरसेवक आहेत. आजच्या राज ठाकरेंसोबतच्या त्यांच्या भेटीतून या सगळ्या वादावर पडदा पडल्याचे मानण्यात येते आहे.