रणजित जाधव, मावळ, पुणे | 28 जुलै 2023 : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आहे. रस्त्यांवरील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. हवामान विभागाकडून अजूनही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. सध्या पुणे आणि घाट परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. पुणे घाटमाथ्यावर अन् लोणावळा परिसरात अतिमुसळधार पाऊस होत आहे. यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर त्याचा परिणाम झाला आहे. या मार्गावर पुन्हा दरड कोसळली आहे. गेल्या आठ दिवसांत दुसऱ्यांदा दरड कोसळण्याची घटना घडली आहे.
कामशेत बोगद्याजवळ मातीचा ढिगारा गुरुवारी कोसळला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्यासाठी पुणे, मुंबई द्रुतगती मार्गावर शुक्रवारी पुन्हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सलग दुसऱ्या दिवशी ब्लॉक घेण्यात येणार आहे. दोन तासांच्या हा ब्लॉक पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळ होणार आहे. या ठिकाणी सैल झालेली दरड हटवली जाणार आहे. या ठिकाणावरुन गुरुवारी मध्यरात्री मातीचा ढिगारा मार्गावर कोसळला होता. त्यानंतर शुक्रवारी हा ब्लॉक घेतला जात आहे.
शुक्रवारी दुपारी दोन तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. दुपारी 2 ते 4 दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक किवळेपासून वळवली जाणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे मुंबई महामार्गावरुन ही वाहतूक जाणार आहे. त्यानंतर पुन्हा लोणावळ्याजवळ नव्या द्रुतगती मार्गाला ही वाहतूक जोडली जाणार आहे. यावेळी पुणे शहराकडे येणारी वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा तिसऱ्यांदा ब्लॉक घेतला जात आहे. यापूर्वी सोमवारी आणि गुरुवारी विशेष ब्लॉक घेऊन काम करण्यात आले. यावेळी आडोशी बोगद्याजवळची दरड हटवण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी होणार आहे. जुन्या मार्गावर यावेळी महामार्ग पोलीस असणार आहे. ते वाहतूक सुरळीत करण्यास मदत करतील.