योगेश बोरसे, पुणे : सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. युवकांना लवकरच चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. राज्यभरात 2070 पदे भरली जाणार आहेत. तसेच पुणे महानगरपालिकेत शिक्षक म्हणून रुजू होण्याची संधी मिळणार आहे. येत्या काही दिवसांत या नोकरीसाठी जाहिरात येणार आहे. यामुळे बेरोजगार युवकांना चांगल्या नोकरीची संधी लवकरच मिळणार आहे. ही संधी कृषी अन् शिक्षण या दोन विभागात असणार आहे.
राज्यातील कृषी सेवकांची 2070 पदे भरली जाणार आहे. कृषी विभागतील नव्या भारतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. यावर लवकरच निर्णय होणार आहे, अशी माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. कृषी विभागातील 80 टक्के रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि लातूर या विभागात भरती होणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 90 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. परंतु शिक्षकांच्या 508 जागा रिक्त आहेत. आता या जागा भरण्यात येणार आहे. 6 महिन्यांसाठी करार पद्धतीने पुणे महापालिका शिक्षक भरती करणार आहे. पुणे महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांच्या 508 रिक्त जागांपैकी 329 शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहे. ही भरती झाल्यानंतरही शिक्षकांच्या 179 जागा रिक्त राहणार आहे.
पुणे मनपाच्या शाळांमध्ये पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती केली गेली नाही. यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक नाही, अशी परिस्थिती आहे. पुणे मनपाच्या शिक्षण विभागाने 50 हून अधिक माजी कंत्राटी शिक्षकांच्या कराराचे नूतनीकरण केले नाही. या शिक्षकांचे मे महिन्याचे मानधन बाकी आहे. हे मानधन प्रत्येकी 15,000 रुपये असताना दिले गेले नाही. विशेष म्हणजे पुणे महानगरपालिकेची तिजोरी भरलेली असताना शिक्षकांना मानधन दिले गेले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 320 पदांसाठी परीक्षा पार झाली. महापालिकेमधील विविध पदांच्या भरतीसाठी महापालिकेच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली. पहिल्या टप्प्यातील ही परीक्षा सुरळीत पार पडली.
पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद या पाच शहरात ही परीक्षा घेण्यात आली. पिंपरी चिंचवड मनपातील 320 पदांच्या भरतीसाठी 10 हजार 171 अर्ज प्राप्त झाले आहेत. महापालिकेतील वर्ग एक, दोन आणि तीन मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे.