प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 11 ऑक्टोबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात रोज नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धंगेकर यांच्या या आरोपामुळे केवळ ससून रुग्णालय प्रशासनच नव्हे तर पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. धंगेकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून ससूनच्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांना या गोष्टी माहीत आहे. आपले उमलते फुल जाळू नका. काही करा, लहान मुलांवर लक्ष ठेवा. आमची मुलं आहेत, तशी तुमची मुलं आहे. 17-18 वर्षांची ही मुलं आहेत. ती ड्रग्सच्या आहारी जात आहेत. त्यांच्या घराखालीच जर गांजा आणि अमलीपदार्थ मिळत असेल तर चुकीचं आहे. सहाही लोकांवर गुन्हा दाखल करा. आरोपीवर उपचार करणाऱ्या डीनसह जेवढे डॉक्टर आहेत. त्या सर्वांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
या प्रकरणात पोलिसांची भूमिका चुकीची आहे. चौकीदारच चुकीचं वागत असेल तर पुण्याची परिस्थिती चांगली राहणार नाही. पंजाबनंतर पुण्यात ड्रग्सचं मोठं रॅकेट आहे. ते थांबवा अशी विनंती मी विधानसभेत केली होती. पण त्यावर काही झालं नाही. पैसे खाण्यासाठी गुन्हेगारांना मोकळं सोडलं जात आहे. ललित पाटील प्रकरणात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असू शकतील. भारतातीलही गुन्हेगार असतील त्याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही धंगेकर यांनी केली.
यावेळी रवींद्र धंगेकर यांनी एक मोठा आणि धक्कादायक आरोप केला आहे. ड्रग्स माफिया ललित बापटला महिला पुरवल्या जात होत्या. तो व्हिडीओ मी समोर आणणार आहे. हॉटेलवर जाण्याआधी तो कोणाला भेटला. हॉटेल वर तो कोणाला भेटायला जायचा हे सर्व त्या व्हिडीओत आहे, असा खळबळजनक दावा धंगेकर यांनी केला आहे. धंगेकर यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
ललित पाटीलसारखा गुन्हेगार ससूनमध्ये मुक्काम करत होता. त्याला हॉस्पिटलमध्ये बायका पुरवल्या जात होत्या. माझ्या या दाव्यात शंभर टक्के तथ्य आहे. तो तिथून पळून गेला. ज्या सोसायटीत पळून गेला तिथे ज्याचा फ्लॅट आहे, त्या ठिकाणी तो आदल्या दिवशी राहिला होता. त्या फ्लॅटमध्ये महिला होत्या. त्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. पंचतारांकित हॉटेलात तो कशाला जात होता? एका बंगल्यात ड्रग्ज माफिया कसा ठेवला जात होता? असा सवाल त्यांनी केला.
ससूनचे डीन संजीव ठाकूर यांच्यासह इतर डॉक्टरांनाही सहआरोपी करा. देवेंद्र फडणवीसांनी राजकरण कमी करावे आणि याकडे जास्त लक्ष द्यावं. फडणवीस यांची अजून एकही प्रतिक्रिया आली नाही. मी त्यांना घाम फोडणार आहे. या प्रकरणात पोलिस आणि डॉक्टरांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी धंगेकर यांनी कालच केली होती.