रणजित जाधव, मावळ, पुणे : पुणे शहरात भरदिवसा सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्यांवर शुक्रवारी प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांचे निधन झाले. या प्रकारानंतर पुणे शहरात खळबळ माजली आहे. हा हल्ला कोणी केली हे प्रश्न असताना आवारे यांच्या कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचे नाव घेतले. त्यानंतर सुनील शेळके यांच्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न माध्यमे करीत होते. अखेर त्यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. आमच्या मतभेद होते, पण मनभेद नव्हते, अशी भूमिका घेत सूत्रधार शोधल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले की, किशोर आवारे यांची काल हत्या झाली, त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. त्यानंतर आज सकाळी सुनील शेळके नॉट रीचेबल, त्यांचा मोबाईल स्विच ऑफ अशा बातम्या प्रसार माध्यमांनी चालवल्या. त्याअनुषंगाने मी पत्रकार परिषद घेत आहे.
मनभेद नक्कीच नव्हते
किशोर आवारे यांची जी हत्या झाली, या घटनेचे आरोपी कोण? ती घटना का घडली? यामागची सत्यता काय आहे? गुन्हेगारांचा पार्श्वभूमी काय आहे? याची सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. मात्र या घटनेनंतर वेगळा पायंडा पाडण्याचे काम राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून कोणी करू नये. यासाठी आम्ही सामंजस्याने काम करतोय. किशोर आवारे यांच्यासोबत मतभेद होते, मात्र मनभेद नक्कीच नव्हते. परंतु काही मंडळी जाणीवपूर्वक या घटनेला राजकीय वळण देऊ पाहतायेत, त्यांनी कृपया तसे करू नये. जी सत्यता आहे ती समाजासमोर मी नक्की येईल.
सूत्रधारास समोर आणणार
काल रात्री जी फिर्याद देण्यात आली. त्यात मी, माझा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडेसह इतर काहींनी मिळून या हत्येचा कट केला, असं फिर्यादीत नमूद आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती गेली तर त्यांची भावना तीव्र असते हे आम्ही समजून आहोत. परंतु त्यामागचे खरे सूत्रधार कोण? जाणीवपूर्वक बदनामी कोण करतो? हे समोर आणल्याशिवाय मी राहणार नाही.
विकासाचे राजकारण करा
या मायबाप जनतेने आयत्यावेळी पक्ष बदलला तरी 94 हजार मतांनी निवडून दिलं. त्यामुळं राजकारण करताना विकासाचे करावे, आरोप करताना हे तात्पुरते असावेत. कामातून मी माझी जबाबदारी दाखवत असतो. गेल्या तीन वर्षांपासून तेच करत आलोय. राजकारणापासून अलिप्त व्हायचं असेल तर आज होतो, पण अशी बदनामी कदापी सहन करणार नाही. माझी कोणतीही चौकशी लागली तरी मी पोलीस यंत्रणेला उपलब्ध असेल. सखोल चौकशीतून सर्व समोर आलंच पाहिजे. आजवर मी कोणावर हात उचलला नाही, त्यामुळं आम्ही कोणाच्या जीवावर बेतणारे राजकारण कदापी करणार नाही. हे आमच्याकडून कधीच शक्य नाही. कारण आम्ही सुद्धा हे भोगलेलं आहे.
चौकशीतून आलेले सत्य स्वीकारणार
आमच्या कुटुंबातील व्यक्ती गेल्यावर, त्या कुटुंबर काय परिस्थिती येते. हे आम्ही जाणून आहोत. त्यामुळं एखाद्याच्या जीवावर उठण्याऐवजी मी घरी बसेन. मात्र जाणीवपूर्वक बदनामी करू नये. माझा भाऊ कष्ट करतो, मेहनत घेऊन मला आर्थिक पाठबळ देतो. त्याचं नाव घेऊन त्याला कोणी बदनाम केलं, तर मी जशास तसं उत्तर द्यायला तयार आहे. मी पोलीस यंत्रणेचे रात्रंदिवस संरक्षण आहे. आम्ही ऐऱ्या गैऱ्या गुन्हेगारांशी का संबंध ठेऊ? मी नको त्या गोष्टींकडे लक्ष का देऊ? कोणी कोणाच्या जीवावर उठेल याचा अर्थ सुनील शेळके अशा प्रवृत्तीच्या जवळ कधीच जाणार नाही. मी चौकशीतून जे सत्य समोर येईल ते मी स्वीकारेन.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
मी उद्याच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते अजित पवार तसेच वेळ पडल्यास मुख्यमंत्रांशी ही याबाबत चर्चा करणार आहे. या हत्येतील जे गुन्हेगार आहेत, त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन पोलिसांकडे मागणी करायला हवी.