रणजित जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 7 जानेवारी 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोबाईलवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. नाटकांसाठी असलेल्या सेन्सॉरशीपच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी ही मागणी केली आहे. नाटकासाठी सेन्सॉरशीप आहे. पण इंटरनेटमुळे सर्व तुमच्या आवाक्यात आलंय. लोक आज ओटीटी प्लॅटफॉर्म पाहत आहेत. त्यासमोर नाटक वगैरे काही नाही. तुम्ही आधी मोबाईलवर बंदी घाला. त्यावर जे चालू असतं ना त्याला सेन्सॉर वगैरे काही नाही. आईबापच नाही त्याला. झालं तर त्यामुळे कॉम्प्लेक्शन कमी होईल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय.
अखिल भारतीय नाट्य संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी हे विधान केलं. 1995 नंतर आपल्या आयुष्याला वेग आला. 95-96ला मोबाईल आलं. इंटरनेट आलं. टेलिव्हिजन चॅनल आले. 572 चॅनल्स आहेत. सर्वात जास्त मोबाईल आपल्याच देशात आहे. 82 कोटी फोन आहेत. सर्वच फोनवर आणि देश व्हेंटिलेटरवर आहे. मध्यमवर्ग गेला. त्यातून आपलं नुकसान झालं. तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करता याचं घेणं नाही. तुम्ही कोणत्या पक्षाला फॉलो करता याचंही मला घेणं नाही. पण मध्यमवर्गाने राजकारणात यावं. राजकारणा उडी घ्या. पुढाकार घ्या. सुशिक्षित असून चालणार नाही, सूज्ञ असावं लागतं. महाराष्ट्राला सूज्ञ लोकांची गरज आहे, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
महाराष्ट्र देशाला दिशा देतो. महाराष्ट्र विचार देतो. कोणतीही गोष्ट घ्या, महाराष्ट्रातील आहे. शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि टिळकही इथूनच गेले. पण तोच महाराष्ट्र आज चाचपडत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. जातीपाती सारख्या फालतू गोष्टीत बरबटून जाऊ नका. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये त्याने काय झालं ते पाहा. आता ओबीसी विरुद्ध मराठा हे सुरू आहे. हे कोणी तरी करत आहे, घडवत आहे. महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून कोणी तरी करत आहे.
जातीसाठी काही तरी करतोय असं वाटतंय, पण तसं नाही. हे कोणी तरी करतंय. त्यासाठी काही चॅनल्स काम करत आहेत. सोशल मीडिया काम करत आहे. काही नेते पक्ष काम करत आहे. हे सर्व महाराष्ट्राचं एकत्रिकरण विखरून टाकत आहेत. त्याचे हे प्रयत्न आहेत. पण आपले नेते मश्गूल आहेत सत्तेत. महाराष्ट्र म्हणून विचार करत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सेन्सॉरशीपच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी अनेक गोष्टी मांडल्या. माझ्यावर अनेक सिनेमे आले. त्यात मला निगेटिव्ह दाखवलं गेलं. पण मी कधीही ते चित्रपट बंद पाडण्याचं काम केलं नाही. करणार नाही. समोरच्याला मी व्हिलन वाटत असेल तर व्हिलन. लक्षात तर तोच राहतो ना? शेवटी ऑर प्राणच येतो ना?, असं सांगतानाच चित्रपट नाटकात चांगले आणि मोठे विषय हाताळले गेले पाहिजे. दोन कोटीचा बजेट असेल तर दोन कोटीच्या लायकीचीच कथा असावी. मोठी उडी घेतली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.
नाट्य चळवळीला गती देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. नाट्यक्षेत्र मोठं करण्यासाठी मी पुढाकार घेईन. सर्व राजकारण्यांना एकत्र करेल. अनेक उद्योगपती महाराष्ट्रात आहे. सीएसआर फंड आहे. पण आपल्याला नाट्य क्षेत्रात बदल घडवण्याची इच्छा आहे का? न्यूयॉर्कला थिएटर आहेत. अमेरिकेतील लोक न्यूयॉर्कला विमानाने नाटक पाहण्यासाठी येतात, दोन दिवस राहतात. निघून जातात. आपल्याकडे असं कधी होणार. आपलं नाटक कधी मोठं होणार? असा सवाल राज यांनी केला.