योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 13 जानेवारी 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजारी आहेत. त्यांना ताप आला असून अशक्तपणा जाणवत आहे. स्वत: राज ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. मला कार्यक्रमाला यायला उशीर झाला. मी येऊच शकत नव्हतो. काल संध्याकाळपासून ताप आल्यासारखं वाटत होतं. आता मी सकाळी उठल्यावर डोळे उघडत नव्हते. अशक्तपणा आहे. पण तुम्ही इतक्या लांबून आला आहात. तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मी परतणार नाही. म्हणून कार्यक्रमाला आलो आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
मनसेने ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी तब्येतीची माहिती दिली. निधी कसा आणायचा? कोणत्या योजना राबवायच्या? काम कसं करायचं? हे तुम्हाला माहीत नसेल असं नाही. तुमच्या भागातील प्रश्न तुम्हाला माहीत आहेत. त्यामुळे ते कसं सोडवायचे हे माहीत आहे. आज ग्रामपंचायती. उद्या जिल्हा परिषदांवर जाल. नंतर आमदार, खासदार व्हाल. पण लगेच आताच स्वप्न पाहू नका. तुम्ही तुमच्या भागात योजना आणाल आणि प्रगती कराल याची कल्पना आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
यावेळी त्यांनी स्वच्छतेचा कानमंत्र दिला. तसेच आपल्या सभोवतालचं वातावरण चांगलं ठेवण्याच्याही सूचना केल्या. आपल्याकडे शिक्षण आणि नोकऱ्या मिळत नाही का? ग्रामीण भागातील मुलं शहरात यायला बघत आहेत. शहरातील मुलं हे परदेशात जाऊ इच्छित आहेत. म्हणजे काय चाललंय? आपली पोरं परदेशात का जात आहेत? शिक्षण आणि नोकऱ्या नाही म्हणून का? तर तसं नाही. ते बाहेर जात आहेत, कारण सभोवतालचं वातवरण नाही.
आसपास जगण्याचं वातावरण नाही. तिथे काय फार मोठ्या नोकऱ्या मिळतात असं काही नाही. इथून पळून जायचं आणि स्वीपर म्हणून काम करायचं. तो डंकी सिनेमा पाहिलाच असेल. त्यात तेच दाखवलं. ती कामे इथेही मिळतात. पण वातवरण चांगलं नाही. त्यामुळे वातावरण चांगलं करा. गावातील मुलांना नवनवीन कल्पना सूचल्या पाहिजे असं वातावरण करा, असं आवाहन राज यांनी केलं.
मी एका गावात गेलो होतो. त्या गावात लोडशेडिंग होती. लोडशेडिंग कसली? 48 तास वीज यायची नाही. गावात नाला, त्याच्या बाजूला दोन घरे. वाईट अवस्था होती. त्या गावात टाकी पाहिली. मी विचार करत होतो. माझ्या शालेय जीवनातील अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत म्हणजे रामगड ग्रामपंचायत. शोले या सिनेमातील रामगड ग्रामपंचायत ही सर्वात भ्रष्ट होती. हा सिनेमा पाहिला का? त्या गावात सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे ठाकूर आहे. त्या गावात वीज नाही, पण पाण्याची टाकी आहे.
वीजच नाही तर टाकीत ठाकूरचा बाप पाणी चढवणार होता का? किती मोठं करप्शन. त्या टाकीला काहीही नव्हतं. या असल्या प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सैनिकांकडून होता कामा नये. गावात गेल्यावर आधीच्या पिढ्यातील लोकांना वाटलं पाहिजे काम करावं तर या लोकांसारखं, नाही तर करू नये. एवढंच सांगायचं. गाव चांगलं आणि स्वच्छ ठेवा. गावातील वातावरण बदलून टाका, असं आवाहन त्यांनी केलं.