पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी पुन्हा एकदा भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरलं आहे. आमच्याकडून मिरवणुका निघतात, त्यावर दगडफेक होत असीतल तर आम्ही शांत बसणार नाही. आमचे हात बांधलेले नाहीत. आम्हालाही दगड हातात घेता येतो. समोर जे काही हत्यार असेल ते हत्यार आमच्या हातात देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. एमआयएमकडून (mim) छेडेंगे तो छोडेंगे नही असा इशारा देण्यात आला आहे. त्यावरही राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. आमचे हात काय बांधलेले आहेत का? असा सवाल राज यांनी केला. यावेळी त्यांनी येत्या 1 मे रोजी औरंगाबादला (aurangabad) जाहीर सभा घेणार असल्याचं जाहीर केलं. तसेच 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणाही केली. ज्यांना अयोध्येला यायचं आहे, त्यांनी माझ्यासोबत दर्शनाला यावं, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे. राज हे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.
सर्व मशीदीवरील लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. ते काढले जात नाहीत. तर आमच्या पोरांनी केलेल्या गोष्टी तुम्ही अनधिकृत कश्या मानता? असा सवाल करतानाच ज्या भोंग्यामुळे त्रास होत असेल अशा भोंग्यांना परमिट देऊ नका. शांतता भंग करणाऱ्या परमिशन नको, असं कोर्टाने म्हटलं आहे. याही पलिकडे आपण काही समजणार आहे की नाही. मुस्लिमांनाही काही गोष्टी समजल्या पाहिजे. या देशापेक्षा धर्म मोठा नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
मला फक्त दोन गोष्टींची घोषणा करायची होती. 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादचं सांस्कृतिक मंडळाचं मैदान आहे. तिथे माझी जाहीर सभा घेणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 5 जून रोजी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहे. अयोध्येला जाऊन दर्शन घेणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
देशातील सर्व हिंदूंना विनंती आहे . 3 तारखेला तयारीत राहा. आता रमजान आहे. त्यामुळे काही करायचं नाही. सांगायचं नाही. पण 3 तारखेपर्यंत कळलं नाही, समजलं नाही तर या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा यांना याचा धर्म महत्त्वाचा वाटत असेल, त्यांना लाऊडस्पीकर मोठे वाटत असेल तर त्यांना जशास तसं उत्तर देणं आवश्यक आहे. आमची तयारी सुरू आहे. या देशात महाराष्ट्रात दंगली नकोय. हाणामारी नकोय. या देशातील महाराष्ट्रातील शांतता भंग करायची नाही. इच्छा नाही. पण माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यांच्या प्रार्थनेला विरोध केलेला नाही. पण त्यांना लाऊडस्पीकरवरूनच ऐकवायचं असेल तर आमच्याही आरत्या त्यांना लाऊडस्पीकरवरून ऐकाव्या लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
संबंधित बातम्या:
Raj Thackeray : येत्या 5 जून रोजी अयोध्येला जाणार, राज ठाकरे यांची मोठी घोषणा