योगेश बोरसे, पुणे | दि. 12 मार्च 2024 : मनसेचे नेते वसंत मोरे यांनी पक्ष सोडला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अखेरचा जय महाराष्ट्र…साहेब मला माफ करा..असे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वसंत मोरे यांनी मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी त्यांच्या डोळ्यात आश्रू आले. ते भावनिक झाले. वसंत मोरे यांनी आपली नाराजी पक्षातील लोकांवर व्यक्त केली. पुणे शहरातील पक्ष चुकीच्या लोकांकडे गेला आहे. पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर काल रात्री मी झोपलो नाही. माझा वाद राज साहेबांशी नाही, मनसेशी नाही, पक्षातील त्या लोकांवर आहे. त्यामुळे आपण बाहेर पडल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.
पक्षातील त्या लोकांची नावे आपण सांगणार नाही. परंतु मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना ती लोक कोण आहेत, ते माहीत आहे. त्या लोकांसोबत पक्षात काम करणे अवघड झाले होते. त्यामुळे मी माझा वेगळा मार्ग निवडला. हा मार्ग निवडण्यापूर्वी माझ्या मित्रांशी चर्चा केल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.
पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मला अनेक नेत्यांचे फोन आले. परंतु मी नेत्यांचे फोन घेतले नाही. मी सामान्य कार्यकर्त्यांचे फोन घेतले. आता शनिवार वाड्यावर जाऊन पुणेकरांना पुढची दिशा विचारणार आहे. सोशल मीडियातून मी पुणेकरांची मते घेईल. त्यानंतर पुढचा निर्णय घेईल. पक्ष संघटना कोणी संपवू शकत नाही. परंतु पक्ष संघटना संपवण्याचे विचार करणारे लोक संपवले पाहिजे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात वसंत मोरे यांनी म्हटले.
२५ वर्ष राज ठाकरे यांच्यासोबत काम केले. त्यानंतरही मला पक्षाच्या कोअर कमेटीमधून वगळण्यात आले. दोन वर्ष मी हे सहन करत होतो. आता मला लोकसभा निवडणूक लढवयाची आहे. परंतु पक्षातील लोकांनी चुकीची माहिती नेत्यांना दिली. पुण्यात पक्षाची कमकुवत असल्याचे अहवाल दिले गेले. आता सर्व गोष्टी असाह्य झाल्या. यामुळे शेवटी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय आपण घेतल्याचे वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
हे ही वाचा
मनसे सोडल्यानंतर वसंत मोरे यांच्यापुढे पर्याय काय? वसंत मोरे यांनी सांगितले…