संतोष नलावडे, सातारा | 11 डिसेंबर 2023 : साताऱ्यातील कोरेगावमध्ये मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आले होते. मनसेकडून आयोजित केसरी बैलगाडा शर्यतीसाठी ते उपस्थित राहिले होते. यावेळी बैलगाडा शर्यतीचा थरार त्यांनी अनुभवला. मनसेकडून अमित ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बैलगाडीमध्ये बसण्याची विनंती केली. मात्र तसे न करता अमित ठाकरे स्वतः बैलगाडी सोबत जोडलेल्या बैलांच्या बरोबर चालत स्टेजपर्यंत आले. दोन्ही बैलांना नमन केले. यावेळी शर्यतीत विजयी झालेल्या बैलगाडा मालकांनी आनंद व्यक्त करत असताना गुलाल उधळला. यामुळे अमित ठाकरे चांगलेच संतापले. त्यांनी मुक्या प्राण्यांना त्रास होईल, असे काही करु नका या शब्दांत खडे बोल बैलगाडी मालकांना सुनावले.
बैलगाडी शर्यतीचा थरार झाल्यानंतर विजयी बैलगाडी मालकांनी जल्लोष सुरु केला. यावेळी काही जणांनी गुलाल उधळला. परंतु गुलालामुळे मुक्या प्राण्यांना त्रास होतो. तुम्ही आनंद व्यक्त करा. पण प्राण्यांना त्रास होईल, असे काही करु नका, असे अमित ठाकरे यांनी सांगितले. त्यानंतर माईकचा ताबा घेत सर्वांना पुन्हा ही सूचना दिली. यावेळी बैलाविषयी त्यांचा कमालीचा आदर पाहायला मिळाला.
मनसेकडून आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बैलगाडी स्पर्धकांची उपस्थिती होती. तसेच राज्यभरात बैलगाडा शर्यतीमध्ये चर्चेत असणारा बकासुर बैलाला पाहण्यासाठी गर्दी झाली. अमित ठाकरे हे आवर्जून स्टेजवरून खाली आले. त्यांनी त्या बैलाच्या मालकासोबत चर्चा केली. बैलाच्या आरोग्याची विचारपूस केली. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मनसे केसरी बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने प्रसिद्ध माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना अचानक सूत्रसंचालकाने बोलण्यास सुरुवात केली असता. त्यांनी आपली प्रतिक्रिया मध्येच थांबवत या ठिकाणी संजय राऊत आलेत का? असे म्हणत राऊत यांची खिल्ली उडवली.