शर्मिला ठाकरे यांच्याकडे तिकीटासाठी साकडं, वसंत मोरे यांची जोरदार लॉबिंग; मनसेत काय घडतंय?

| Updated on: Dec 29, 2023 | 8:41 PM

पुण्यात मनसेच्या चार नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कुणाला उमेदवारी द्यायची? हा मोठा प्रश्न राज ठाकरे यांच्यासमोर उभा राहू शकतो. विशेष म्हणजे राज ठाकरे सध्या पुण्याच्या मतदारसंघाकडे जास्त लक्ष ठेवून आहेत. असं असताना पक्षातील चार नेत्यांनी खासदारकीची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.

शर्मिला ठाकरे यांच्याकडे तिकीटासाठी साकडं, वसंत मोरे यांची जोरदार लॉबिंग; मनसेत काय घडतंय?
vasant more and sharmila thackeray
Follow us on

पुणे | 29 डिसेंबर 2023 : लोकसभा निवडणुकीचं बिगूल अद्याप वाजलेलं नाही. पण प्रत्येक पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने काही महत्त्वाच्या मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. यापैकी पुणे लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मतदारसंघाकडे विशेष लक्ष देवून आहेत. त्यांच्याकडून सातत्याने पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय. राज ठाकरे सातत्याने पुण्याचा दौरा करत आहेत. याशिवाय त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे यादेखील सातत्याने पुण्याच्या दौऱ्यावर जात आहेत. मनसेचा पुण्यात कामांचा धाडाका सुरु आहे. असं असताना आता ऐनवेळी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षातील चार नेत्यांनी खासदारकीच्या उमेदवारीची इच्छा व्यक्त केलीय. यामध्ये पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे, मनसे नेते साईनाथ बाबर, बाबू वागस्कर, किशोर शिंदे यांचा समावेश आहे. वसंत मोरे यांनी अनेकदा खासदारीची इच्छा व्यक्त केली आहे. पण साईनाथ बाबर यांनीदेखील इच्छा व्यक्त केल्याने मोरे यांनी थेट शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं नाव घेत साकडं घातलं आहे.

“मी राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे आणि वहिनी साहेबांकडे (शर्मिला ठाकेरे) देखील खासदार होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. मी माझा मेसेज थेट राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. मला कुणाच्या मार्फत मॅसेज देण्याची गरज नाही”, अशी भूमिका वसंत मोरे यांनी मांडली. “ठाकरे कुटुंब माझ्यासाठी देव आहेत. सर्वात आधी मी इच्छा व्यक्त केली होती. मी पुणे लोकसभा लढवली तर 100 टक्के जिंकून दाखवेन. मी बारामती लोकसभा नाही लढवणार, संधी दिली तर पुण्यातूनच लढणार. राज ठाकरे जे सांगतील तीच भूमिका वसंत मोरे आजपर्यंत घेत आला आहे”, असं वसंत मोरे म्हणाले.

‘….तर खासदारकी देऊन टाकू’

वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांच्या प्रश्नावरही उत्तर दिलंय. “साईनाथ बाबर आणि वसंत मोरे हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. साईनाथ बाबर यांनी गटनेते व्हायची इच्छा व्यक्त केली, मी गटनेते पद दिलं, शहराध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली, मी शहराध्यक्ष पद दिलं, जर खासदार व्हायची इच्छा व्यक्त करत असतील तर खासदारकी देऊन टाकू. राज ठाकरेंनी सांगितलं तर शंभर टक्के साईनाथ बाबर यांना पाठिंबा देणार”, असं वसंत मोरे म्हणाले.

“राज साहेबांचा आदेश हाच अंतिम निर्णय असेल. राज ठाकरेंनी सांगितलं तर साईनाथ बाबर यांचा मी स्वतः प्रचार करेन. पुण्यात मनसेसाठी चांगलं वातावरण आहे. शेवटी पुण्याचा खासदार कोण होईल हे पुणेकर ठरवतील. राज ठाकरे सांगतील तोच पुण्यात उमेदवार होईल”, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.