नाराजीच्या चर्चांनंतर वसंत मोरे राज ठाकरे यांच्या भेटीला, मनसे अध्यक्षांच्या पुण्यातील निवासस्थानी खलबतं, नेमकी चर्चा काय?

| Updated on: Jan 08, 2023 | 5:22 PM

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली आहे.

नाराजीच्या चर्चांनंतर वसंत मोरे राज ठाकरे यांच्या भेटीला, मनसे अध्यक्षांच्या पुण्यातील निवासस्थानी खलबतं, नेमकी चर्चा काय?
Image Credit source: Google
Follow us on

प्रदीप कापसे, Tv9 मराठी, पुणे : पुण्यात आज महत्त्वाच्या घाडमोडी घडत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील महत्त्वाचे नेते वसंत मोरे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले होते. त्यांनी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सोशल मीडिया किंवा प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या सगळ्या घडामोडींदरम्यान आज वसंत मोरे यांनी स्वत: राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे वसंत मोरे यांच्या नाराजीच्या चर्चांना मोरेंकडूनच ब्रेक देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्याकडून पुण्यात मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यासाठी राज ठाकरे हे स्वत: लक्ष देत आहेत. ते पुणेकरांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे संवाद साधत आहेत. पुण्यातील तळागळ्यातील कार्यकर्त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुण्यात मनसेच्या गोटात पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत कलह असल्याच्या अनेक बातम्या याआधी समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे पुण्याचे माजी शहाराध्यक्ष वसंत मोरे यांनी वेळोवेळी आपली नाराजी जाहीर केलीय.

हे सुद्धा वाचा

आपल्या पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांकडून डावललं जातं, बैठकांना बोलावलं जात नाही, अशी तक्रार अनेकदा वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांसमोरही केलीय. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांनी राज ठाकरेंना उद्देशून तक्रार केलीय.

दरम्यान राज ठाकरेंनी वसंत मोरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून चांगलीच कानउघाडणी केली होती. तेव्हापासून वसंत मोरे हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण राज ठाकरे यांनी सुनावल्यापासून वसंत मोरे यांनी माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडली नव्हती. त्यानंतर आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. वसंत मोरे यांनी प्रत्यक्षात राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतलीय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान वसंत मोरे यांनी राज ठाकरेंना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं.

वसंत मोरे यांच्या प्रयत्नातून गतीमंद मुलांसाठी कात्रज ते गोखलेनगर बस सेवा सुरु होणार आहे. या बस सेवेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

या बस सेवेचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचसाठी वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय. याशिवाय या भेटीतून वसंत मोरे यांनी नाराजीच्या चर्चांना ब्रेक देण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता आहे.