अभिजित पोते, पुणे | दि. 12 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दौरे सुरु केले आहेत. राज ठाकरे यांनी पुणे शहराकडे लक्ष केंद्रीत केले आहे. पुणे शहराची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे दिली आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून लोकसभेसाठी मनसे नेते साईनाथ बाबर आणि वसंत मोरे इच्छूक आहे. दोघांनी निवडणूक लढवण्याची तयारी पक्षाकडे आणि जाहीररित्या व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देणार त्याचे स्पष्ट संकेत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर वसंत मोरे यांनीही आपली तयारी सुरु ठेवली. आता मनसे नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टवरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या पोस्टमुळे वेगवेगळे अर्थ काढले जात असून मनसेमधील गटबाजी समोर आल्याचे बोलले जात आहे. यानंतर मंगळवारी दुपारी १ वाजता वसंत मोरे यांनी फेसबुकवरअखेरचा जय महाराष्ट्र…साहेब मला माफ करा…, अशी पोस्ट केली.
वसंत मोरे यांनी दोन वाक्यांची आणि १९ शब्दांची पोस्ट लिहिली आहे. परंतु ही पोस्ट सोशल मीडियावरच नाही तर पुण्यातील राजकारणात खळबळ उडवणारी ठरली आहे. वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, एका मर्यादेच्या बाहेर त्रास केल्यानंतर माणूस शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा करतो. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात वसंत मोरे यांनी लिहिलेली भावनिक पोस्टचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. पुण्यात मनसेमध्ये अंतर्गत गटबाजी? समोर आल्याची चर्चा या पोस्टमुळे सुरु झाली आहे.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पुण्यात आल्या होत्या. त्या वेळी एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले होते की, साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पहायचं आहे. त्यांना आता महापालिकेत पाठवायचे नाही. त्यांना दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल. त्यानंतर मनसेकडून साईनाथ बाबर यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.
वसंत मोरे यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. एकाने म्हटले आहे की, आताची वेळ फक्त सहन करायची आणि निष्ठा दाखवायची आहे. ‘सबर का फल बहोत मिठा होता है’. परंतु दुसरा म्हणतो जेथे आपल्या निष्ठेची कदर केली जात नाही, तेथे आपण आपले निर्णय घेतले पाहिजेत.