Pune News : मनसेचा पहिला खासदार पुण्यातून करण्यासाठी राज ठाकरे यांनी कोणावर दिली जबाबदारी

| Updated on: Sep 11, 2023 | 3:12 PM

Pune MNS news : राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष सध्या पुणे शहरावर लागले आहे. प्रत्येक पक्ष आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे शहरावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी जबाबदारी दिली आहे...

Pune News : मनसेचा पहिला खासदार पुण्यातून करण्यासाठी राज ठाकरे यांनी कोणावर दिली जबाबदारी
Follow us on

पुणे | 11 सप्टेंबर 2023 : पुणे शहर आणि जिल्हा कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड होता. या गडात भारतीय जनता पक्षाने छेद देत आपले बस्तान बसवले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आणखी बिकट होणार आहे. महायुतीत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील कोणत्या जागा भाजपकडे येतील अन् अजित पवार गटाला काय मिळेल, हे निवडणुकीत ठरणार आहे. त्याचवेळी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे शहरावर लक्ष केंद्रीत केले आहे. राज ठाकरे यांनी पुण्याची जबाबदारी खास व्यक्तीवर दिली आहे.

मनसेने कोणावर दिली जबाबदारी

पुणे लोकसभेतून भाजपचे गिरीश बापट खासदार होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त आहे. मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग चंदू बारणे तर शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे खासदार आहेत. जिल्ह्यात तीन पक्षांचे तीन खासदार असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे जिल्ह्यावर फोकस केले आहे. राज ठाकरे स्वत: वारंवार पुणे दौरे करत आहेत. त्यानंतर घराच्या व्यक्तीवर पुण्याची जबाबदारी दिली आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव मनसे नेते अमित ठाकरे पुण्यातून मनसेचा पहिला खासदार देणार का? याची चर्चा सुरु आहे.

अमित ठाकरे मंगळवारी पुणे दौऱ्यावर

मनसे नेते अमित ठाकरे मंगळवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुण्यात उद्या लोकसभा निवडणुकी संदर्भात अमित ठाकरे बैठका घेणार आहेत. पक्ष बांधणी, उमेदवार निवड, प्रचार अशा विविध मुद्यांवर या बैठका होणार आहे.
पुणे लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने उद्या पुण्यात महत्वाच्या बैठकांचे आयोजन केले आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील पहिला खासदार पुण्यातून देण्याची जबाबदारी अमित ठाकरे पार पाडणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

मावळमधून तयारी लागण्याचे आदेश

मावळ लोकसभा मतदारसंघात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही तयारी सुरू केली गेली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात मनसे उमेदवार देणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता. मावळमध्ये निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश पक्षाकडून मनसे कार्यकर्त्यांना दिले आहे.