पुणे : मी पक्षाची नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका मांडली आहे. मी पक्षाच्या स्थापनेपासून मनसेत आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्यांनी मला सांगू नये, असे मनसे (MNS) शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) म्हणाले आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी माझे बोलणे झालेले नाही. त्यांनी बोलावले तर मी माझी भूमिका त्यांना समजावून सांगेल. कारण मला माझा प्रभाग नाही तर शहर शांत ठेवायचे आहे, असेही ते म्हणाले. टीका करणाऱ्यांनाही त्यांनी सुनावले आहे. ते म्हणाले, एवढेच होते, तर राज ठाकरे यांच्या भाषणानंतर किती जणांनी शहरात स्पिकर लावले? जे बोलतायेत त्यांनी आत्मपरीक्षण करावे, वसंत मोरेला पक्ष भूमिकेबद्दल शिकवू नये, असे वसंत मोरे म्हणाले आहेत. प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी भोंग्यावर मत मांडताना वसंत मोरेंची भूमिका पक्षाची भूमिका नाही, असे म्हटले होते.
शहराध्यक्ष वसंत मोरे यांचा वैचारिक गोंधळ झालेला आहे. त्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही. आम्ही शहरातील सर्व पोलीस स्टेशनला मशिदीवरचे भोंगे काढा म्हणून पत्र दिली आहेत. पोलिसांना तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. तीन दिवसात शहरातील मशिदीवरचे भोंगे काढले नाहीत, तर आम्ही मशिदीसमोर स्पिकरवर हनुमान चालीसा लावणार, असे ते म्हणाले.
वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. ते म्हणतात, की एखाद्या किल्ल्याचे बुरूज ढासाळायला लागले ना, की किल्ला पडायलाही वेळ लागत नाही. जेव्हा एखादा नेता पक्षाचा राजीनामा देतो ना तेव्हा नक्की त्याचा काहीतरी स्वार्थ असतो. पण जेव्हा एखादा शाखा अध्यक्ष, एखादा कार्यकर्ता राजीनामा देतो ना तेव्हा त्याला जरूर समजावून संगायला पाहिजे. यासह त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.