योगेश बोरसे | 4 डिसेंबर 2023 : पाच राज्यातील विधानसभा निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल होती. या पाचपैकी चार राज्यांत काँग्रेसचे पनीपत झाले. परंतु तेलंगणा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली. पाच पैकी तीन राज्यांत भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. 2018 मध्ये या तीन राज्यांत भाजप नव्हता. ही तीन राज्य काँग्रेसकडे होती. मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस राबवून भाजपने सत्ता मिळवली होती. आता मतदारांनी मध्य प्रदेशात पुन्हा भाजपला सत्ता दिली आहे. तेलंगणा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न करणारे काँग्रेस नेते मोहन जोशी यांचे भावी खासदार म्हणून पुण्यात बॅनर्स लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेसाठी दावा केला जाणार आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र उमेदवार देणार नाही. परंतु काँग्रेसने आपला दावा केला आहे. यामुळे काँग्रेसमधून इच्छूकांनी तयारी सुरु केली आहे. आता तेलंगणा निवडणुकीत मोहन जोशी यांच्याकडे ७ मतदारसंघाची जबाबदारी दिली गेली होती. या ठिकणी काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. युवक काँग्रेसकडून पुण्यात मोहन जोशी यांचे बॅनर्स भावी खासदार म्हणून लावण्यात आले आहे. तेलंगणामधील काँग्रेसच्या विजयानंतर मोहन जोशी यांच्या नावाची चर्चा पक्षात सुरु झाली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरु केली आहे. महायुतीत भाजपच ही जागा लढवणार आहे. कारण अजित पवार यांनी बारामती आणि शिरुरची जागा लढवण्याचा निर्णय पक्षाच्या अधिवेशनात जाहीर केला. यापूर्वी पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपचे गिरीश बापट खासदार होते. त्यांच्या निधनानंतर निवडणूक झाली नाही. परंतु या ठिकाणी त्यांची सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या नावांची चर्चा भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे.