पुणे : केरळमध्ये दरवर्षी १ जून रोजी येणारा मान्सून यंदा उशिराने आला. केरळमध्ये ४ जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर कोकणात ८ जूनपर्यंत येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला. परंतु ७ जून पासून बिपरजॉय चक्रीवादळाने धुमाकूळ घातला. यामुळे मान्सूनची प्रगती थांबली. हवामान विभागाचा अंदाज चुकला. मान्सून कोकणात ११ जून रोजी आला. त्यानंतर संपूर्ण राज्यात १५ जून रोजी येणारा मान्सून २५ जूनपर्यंत आला. यामुळे मान्सूनवर असलेले सर्व चक्र काही दिवस थांबले होते. परंतु गेल्या दोन, तीन दिवसांपासून मान्सूनची दमदार वाटचाल सुरु आहे. यामुळे आता देशातील अनेक भागांत मान्सून पोहचला आहे.
सोमवारी मान्सूनने देशातील मोठा भाग व्यापला. मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. त्यानंतर गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबचा आणखी काही भाग अन् जम्मू आणि काश्मीर आणि लडाखच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून आज पुढे सरकला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी ट्विट करुन दिली. तसेच पुढील 2 दिवसांत नैऋत्य मान्सून गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
26/6:SW Monsoon further advanced to some more parts of N Arabian Sea,some more parts of Gujarat, Rajasthan,Haryana & Punjab,remaining parts of J&K & Ladakh,today
Monsoon line (NLM) North Arabian Sea, Porbandar, Ahmedabad, Udaipur, Narnaul, Firozpur & Lat 32.5°N/ Long 72.5°E
IMD pic.twitter.com/ZhhinwWtjb— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 26, 2023
महाराष्ट्रात २५ जून रोजी मान्सून दाखल झाला. त्यानंतर राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून सक्रिय असणार आहे. आता कोकण अन् विदर्भात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. तसेच पुढील ४८ तासांत पुणे, सातारा, नाशिकमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली गेली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र अन् मराठवाडामध्ये ही पावसाचा जोर कायम असणार आहे.
पालघरमध्ये मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. उशीरा झाले तरी पावसाचे आगमन झाल्यामुळे भात शेतीच्या कामांना वेग आला आहे . पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाताची लागवड केली जाते. पावसाळ्यात सर्वाधिक लागवड होते. 75 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर भात पीक घेतले जाते. सध्या पेरणी योग्य पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने नांगराच्या मदतीने मशागत करून पेरणी सुरु केली आहे. या भागात अजूनही बैल आणि नांगर यांच्या मदतीने पारंपारिक पद्धतीनेच शेतीची मशागत केली जाते. आता पाऊस झाल्यामुळे भात लागवडीची कामे सुरु आहे.