Monsson : मान्सून सहा दिवस आधीच देशभरात, राज्यात कुठे असणार पावसाचा अलर्ट

| Updated on: Jul 03, 2023 | 11:01 AM

Monsoon and Rain : राज्यात यंदा मान्सून उशिराने दाखल झाला होता. परंतु देशात सर्वत्र मान्सून सहा दिवस आधीच दाखल झाला आहे. नेहमी ८ जुलैपर्यंत मान्सून देशभर पोहचतो. काही ठिकाणी पूरपरिस्थितीसुद्धा निर्माण झाली आहे.

Monsson : मान्सून सहा दिवस आधीच देशभरात, राज्यात कुठे असणार पावसाचा अलर्ट
Follow us on

पुणे : बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सून उशिराने महाराष्ट्रात आला. दरवर्षी ८ जून रोजी दाखल होणारा मान्सून यंदा २५ जून रोजी राज्यात पोहचला. परंतु देशात मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. हवामान विभागाने देशभरात मान्सून पोहचल्याची घोषणा केली आहे. दरवर्षी ८ जुलै रोजी देशात मान्सून दाखल होतो, यंदा तो २ जुलै रोजीच दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील पावसासंदर्भात हवामान विभागाने अलर्ट जारी केले आहे.

राज्यात कुठे अलर्ट

हवामान विभागाने ३ जुलै रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिली आहे. ४ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातसुद्धा ऑरेंज अलर्ट असणार आहे. तसेच विदर्भासाठी ३ जुलै रोजी यलो अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी हलक्या अन् मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

देशात मान्सून दाखल

देशात २ जुलै रोजी सर्वत्र मान्सून दाखल झाला आहे. देशात मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. देशात दरवर्षी ८ जुलै रोजी मान्सून दाखल होतो. परंतु जून महिन्यात देशात आठ टक्के पाऊस कमी झाला आहे. चांगली बातमी म्हणजे जून महिन्यात वायव्य भारतात ४५ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे.

हे सुद्धा वाचा

गुजरातमध्ये जोरदार पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून गुजरातमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. जूनागढ, जामनगर, वलसाड अन् सूरत या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील वेगवेगळ्या जिल्ह्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. फक्त जामनगर जिल्ह्यातच सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जूनागढमधील अनेक भागांत पाणी साचले आहे.

राज्यात मान्सून दाखल झाला. त्यानंतर पुणे आणि मुंबईत पाऊस सुरु आहे. गेल्या आठ दिवसांपासून पुणे अन् मुंबई शहरात पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पुणे शहरातील धरणसाठ्यातही वाढ झाली आहे. परंतु अजूनही मुबलक वाढ झालेली नाही. यामुळे जोरदार पावसाची गरज आहे.