पुणे : राज्यात यंदा उशिराने मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमानाची घोषणा २५ जून रोजी झाली. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून पुणे, मुंबई अन् कोकणात पाऊस सुरु आहे. पावसाच्या आगमनानंतर पेरणीची लगबग सुरु आहे. काही ठिकाणी पेरणी करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी शेतीच्या कामात मग्न असताना हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात अजून किती दिवस पाऊस राहणार आहे, यासंदर्भात माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात येत्या 4, 5 दिवसांत मान्सून सक्रिय राहणार आहे. तसेच येत्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. सातारा, नाशिक, पुणे, पालघर, रत्नागिरी अन् मुंबईला बुधवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. विदर्भ अन् मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
27 Jun: येत्या 4, 5 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे आणि येत्या काही दिवसांत मुसळधार पावसासाठी केशरी आणि पिवळ्या रंगाचा इशारा देण्यात आला आहे.
कृपया IMD कडून अपडेट पहा 1/2
Day 1, 2 pic.twitter.com/ypXa49Ts63— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 27, 2023
सांगली जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला आहे. सांगलीत सोमवारी सकाळपासून काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. त्यानंतर मंगळवारीसुद्धा पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सांगली जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्यामुळे शेतकरी समाधानी आहे. पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पालघर, डहाणू, तलासरीसह पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. पहाटेपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने दमदार हजेरी लावली.
मोठ्या प्रतीक्षेनंतर नाशिक शहरात पावसाने हजेरी लावली. सोमवारी नाशिक शहरात पावसाची संततधार सुरू होती. मात्र नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. ती सोमवारी पूर्ण झाली. सोमवारनंतर मंगळवारी शहरातील वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने घाटमाथा परिसरात यलो अलर्ट जारी दिला होता.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे आता कोयना धरणाचे दोन दिवसांपासून बंद असलेले दोन्ही वीजगृह कार्यान्वित करण्यात आले आहे. धरणातून 2100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु केला आहे. पुणे शहरात मंगळवारी पाऊस झाला. तसेच बुधवारसाठीही ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागपूर शहरात सोमवार रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु झाला. पावसाची संततधार मंगळवारीही सुरू होती. नागपुरात रिमझिम पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला आहे.