प्रदीप कापसे, पुणे | 28 ऑक्टोंबर 2023 : सासू- सूनेचे नाते अनेक ठिकाणी आई-मुलीसारखे असते. सासू-सुनेतील ‘तू तू मैं मैं’ त्या ठिकाणी होत नाही. परंतु काही ठिकाणे अपवादही आहेत. सासू-सुनेतील या नाट्यामुळे पुणे शहरात धक्कादायक प्रकार घडला. सासूने सुनेला नकटी म्हटले…त्यानंतर सुनेला प्रचंड राग आला. रागाच्या भरात तिने सासूवर चाकूने हल्ला केला. या घटनेत सासू गंभीर जखमी झाली आहे. ही घटना पुणे शहरातील येरवडा येथील गणेश नगरमध्ये घडली. याप्रकरणी सुने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला आहे. नात्यांमध्ये कडू-गोड प्रसंग येतात, परंतु हल्ला करण्यासारख्या प्रकार संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
संध्या अशोक मगर (वय ४५, रा. गणेश नगर, येरवडा) यांची मालनबाई परशुराम मगर (वय ७५) या सासू आहेत. मगर कुटुंब येरवडा येथील गणेश नगरमध्ये राहतात. एकाच घरात राहत असल्यामुळे कधी कधी त्यांच्यात सासू-सुनेमधील भांडणासारखा प्रकार होतो. परंतु नुकताच धक्कादायक प्रकार घडला. या दोघी घरामध्ये असताना संध्या ही मालनबाई यांना ‘तू नकटी आहेस’ असे बोलली. त्यावर मालनबाई यांनी सुद्धा चिडून तिला ‘तू पण नकटीच आहेस’ असे म्हटले.
आपणास नकटी म्हटल्याचा संध्या मगर यांना प्रचंड राग आला. तिने सासूबाईंना शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर हा प्रकार मारहाणपर्यंत गेला. त्यावेळी संध्या हिच्या हातामध्ये कांदा कापण्याची सुरी होती. तिच्याने हल्ला करत तिने मालनबाई यांना गंभीर जखमी केले. मालनाबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सासू मालनबाई हिने दिलेल्या फिर्यादीवरुन सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासू-सुनेमधील या प्रकारानंतर परिसरातील अनेकांना धक्का बसला आहे.