खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या भोर तालुक्यातील गावभेट दौऱ्यादरम्यान किकवी गावात नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी नागरिकांना आपल्याला मतदान करण्याचं आवाहन केलं. “राम कृष्ण हरी… वाजवा तुतारी… आमच्या आजीनी आम्हाला रडायला नाही तर लढायला शिकवलं आहे. 7 तारखेला तुतारी वाजवीणारा माणूस या चिन्हासमोरच बटण दाबून पुन्हा एकदा मला या मतदारसंघाची लोकप्रतिनिधी करा”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “या देशाचं धोरण पार्लमेंटमध्ये ठरवलं जातं. पर्लिमेंटमध्ये जेव्हां भाषण करतो त्याच्यातून निर्णय होतात आणि त्याच्यातून त्याची अंबलबजावणी होते. याला लोकशाही म्हणतात. जो जो निर्णय या देशात होतो, त्याची पहिली चर्चा पार्लिमेंटमध्ये होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला निवडून देता, तेव्हा भाषण करायलाच पर्लिमेंटमध्ये पाठवता ना? तिथे गेल्यानंतर आपल्या भागातले प्रश्न भाषणातून मांडायचे असतात, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी केलेल्या पर्लिमेंटमध्ये भाषण करून कायं पोट भरत का?”, या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
“मी कांद्याच्या भावाचा प्रश्न मांडला तर माझं निलंबनचं झालं. मला फाशी दिली तरी प्रश्न मांडत राहणार. माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या वैयक्तिक कुणाशीच नाही, माझी लढाई वैचारिक आहे. शाळा, रस्ते, वीज ही सगळी कामं, विकास काँग्रेसने केली आहेत. मग ह्यांनी 10 वर्षांत कायं केलं? ते विचारतात 70 साल मे क्या किया? याची गंमत वाटते. संविधान बदलायचं पाप हे सरकार करतंय”, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
“संपवायची भाषा त्यांची आहे. बारामतीला येऊन भाजप नेते चंद्रकांत पाटील बोलले होते आम्हाला शरद पवार यांना संपवायचं आहे. मग विकासाचं कायं झालं? का तो रस्त्यातचं उतरला गाडीतून, पुण्यातून निघाले तेव्हा होता गाडीत. सगळे एकवटले आहेत माझ्याविरोधात आणि त्यांचं एकचं लक्ष आहे आणि ते म्हणजे शरद पवार यांना संपवायचं”, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.
“भ्रष्टाचारमुक्त भारत करेन म्हणून त्यांना ह्या देशाने निवडून दिलंय, पुढे कायं झालं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पर्लिमेंटमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजप नेते अशोक चव्हाण या दोन लोकांवर आरोप केले होते. आज अशोक चव्हाण भाजपमध्ये आहेत आणि अरविंद केजरीवाल जेलमध्ये. आदर्श शिक्षक, आदर्श आई हे ऐकलं होतं. घोटाळ्यातला आदर्श पहिल्यांदा ऐकला. निर्मला सीतारामण बाई सज्जन आहे, पण त्या परवा म्हणाल्या आमच्या पक्षात सर्वांना मुक्त प्रवेश आहे. मग एका पत्रकाराने विचारलं तुम्हीच ईडी, सीबीआय सारख्या 9 नोटीस त्यांना पाठविल्या, मग ह्यांना पण पक्षात घेणार का? मग त्या म्हणाल्या आम्ही सगळ्यांना घेऊ. यावर काय बोलणार? तीस वर्षांनी जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या देशाचे उत्तम प्रधानमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांचे नाव लिहिले जाईल”, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.