पुणे, दि. 30 डिसेंबर 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षा वेळापत्रक आले आहे. एमपीएससीचा रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमांसाठी ही शेवटची संधी आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर जागा निघतील अशी अपेक्षा होती. एमपीएससीची परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी असताना आता आयोगाने केवळ २०५ जागांसाठी जाहिरात काढली आहे. जुन्या परीक्षानुसार ही शेवटची संधी असल्यामुळे तीव्र स्पर्धा होणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे एमपीएससी परीक्षा देणारे लाखो विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
एमपीएससीने नवा अभ्यासक्रम लागू केला होता. परंतु वर्षानुवर्ष विद्यार्थी जुन्या अभ्यासक्रमाने अभ्यास करत होते. अचानक नवीन अभ्यासक्रम लागू केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी पुणे शहरातून आंदोलन सुरु केले. २०२३ च्या सुरुवातीला झालेल्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनास आमदार रोहित पवार यांनी पाठबळ दिले. शरद पवार यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थी हिताचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम लागू केला. नवा अभ्यासक्रम लागू होण्यापूर्वी एसपीएससीने जुन्या अभ्यासक्रमाच्या आधारे जास्त संधी देण्याची अपेक्षा असताना २०२४ च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी केवळ २०५ जागा काढण्यात आल्या आहेत.
आयोगाकडून एकूण ३२ संवर्गासाठी परीक्षा घेतल्या जातात. परंतु आता काढलेल्या जाहिरातीत केवळ १२ संवर्ग दिले आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलिस उपाधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक या महत्त्वाची पदेच नाहीत. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे.