अभिजित पोते, पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा खुनाचा उलगडा झाला आहे. तिची हत्या झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर पाचव्या दिवशी या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. सुरुवातीपासून पोलिसांना ज्या व्यक्तीवर संशय होतो, त्यानेच खून केला आहे. परंतु खून केल्याचे कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे. एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शन पवार हिच्या हत्याकांड प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली होती. पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपी राहुल हंडोरे याचा शोध घेत त्याला अटक केली. राहुल हंडोरे याला मुंबईत अटक करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी १८ जून रोजी दर्शना पवार हिचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. परंतु हा मृतदेह कुजलेला होता. त्यामुळे ओळख पटवणे अवघड झाले होते. दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार १५ जून रोजी तिच्या पालकांनी नोंदवली होती. पोलिसांना सुरुवातीपासून तिच्या घातपाताची शक्यता होती.
दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे एकमेकांना फक्त ओळखतच नव्हते तर ते नातेवाईक आहेत. दोघांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली होती. परंतु एमपीएससीमध्ये यश राहुल ऐवजी दर्शनाला आधी मिळाले. दोघांना अधिकारी होऊ लग्न करायचे होते. राहुल याने दर्शनासोबत लग्न करण्याची आपली इच्छा होती. परंतु तो एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाला नाही, हेच मोठी लग्नासाठी अडचण ठरली.
दर्शनाच्या घरच्या मंडळींनी तिचे लग्न दुसर्या मुलासोबत जमवले होते. लग्नाची तयारीसुद्धा सुरु झाली. या लग्नामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने दर्शनाला अन् तिच्या कुटुंबियांना एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असा आग्रह धरला. तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे तो सांगत होता. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. यामुळे राहुलने दर्शनाला संपवण्याचा निर्णय घेतला.
राहुल याने १२ जून रोजी दर्शनाला राजगडावर फिरण्यासाठी चलण्याचा आग्रह धरला. नातेवाईकच असल्याने दर्शना तयार झाली. मग दोघेही 12 जूनला राजगडावर गेले. सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी ते पोहचल्यावर दोघांनीही गड चढायला सुरुवात केली. गडावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोघे गड चढत असल्याचा प्रकार कैद झाला. मात्र त्यानंतर 10 वाजता राहुल हंडोरे एकटाच परत आला. त्यावेळी दर्शना त्याच्या सोबत नव्हती. त्यामुळे पोलिसांना संशय आला. अन् त्या दिशेने तपास सुरु केला. त्याच्या शोधासाठी पाच पथके तयार केली अन् अखेर त्याला पकडण्यास पोलिसांना यश आले.