पुणे : एमपीएससीने (Maharashtra Public Service Commission) 2020च्या जाहीरातीमधील एमपीएससी ‘गट ब’ची मुख्य परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. गेल्या एक वर्षापासून मुख्य परीक्षा रखडली आहे. 4 सप्टेंबर 202 ला पूर्वपरीक्षा झाली होती. तर 29 जानेवारीला मुख्य परीक्षा होणार होती. पूर्व परीक्षेत काही प्रश्न चुकल्याने विद्यार्थी थेट न्यायालयात (Court) गेले होते. यासंबंधीचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे आयोगाच्या मुख्य परीक्षेस विलंब होत आहे. दरम्यान, याप्रकरणी एमपीएससी कोणताही तोडगा काढत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एमपीएससीच्या विरोधात पुण्यात विद्यार्थी आंदोलन (Students agitation) करणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता अलका चौकात विद्यार्थी आयोगाला आवाहन करत आंदोलन करणार आहेत. मुख्य परीक्षा लवकरात लवकर घ्यावी अशी मुख्य मागणी विद्यार्थ्यांची आहे.
एमपीएससी गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे पुढे ढकलल्याची माहिती एमपीएससी आयोगाकडून देण्यात आली होती. 5 आणि 12 फेब्रुवारीला ही परीक्षा होणार होती. काही विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्याने परीक्षा पुढे ढकलत असल्याचे आयोगाने म्हटले होते. काही विद्यार्थ्यांनी न्यायालयीन लढ्याचा मार्ग स्वीकारल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ एसपीएससी आयोगावर आली. गेल्या काही महिन्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेकदा एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. यावरून विद्यार्थी अनेकदा आक्रमकही होत आहेत.
एसपीएससी आयोगाने पूर्व परीक्षेतील तीन प्रश्न रद्द केल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला, असे मत विद्यार्थ्यांनी कोर्टात मांडले होते. यामुळे आमचे नुकसान झाले आहे, आयोगाच्या प्रश्न रद्द करण्यामुळे आम्हाला मुख्य परीक्षेला बसता येत नाही, तर न्यायालयाने आम्हाला मुख्य परीक्षेला बसण्याची परवागी द्यावी, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी न्यायालयात लढा सुरू केला आहे. आता पुण्यातील अलका चौकात आंदोलन करून आयोगाला विचारणा केली जाणार आहे.