पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मध्यस्थी केल्याने पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. शरद पवार यांच्या भेटीनंतर उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. पण काही विद्यार्थी अजूनही आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आंदोलन सुरु आहे. MPSC विद्यार्थ्याचं गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी घेतली होती. विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहता स्वत: शरद पवार यांनीदेखील या आंदोलनाची दखल घेतली. ते रात्रीच्या अकरा वाजता आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांची मागणी पूर्ण करणार, असं आश्वासन दिलं. यासाठी त्यांनी आपल्याला विद्यापीठाच्या कुलगुरुंचं पत्र आल्याचा उल्लेख केला.
याशिवाय आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधलाय. दोन दिवसांत त्यांच्यासोबत बैठक बोलावून मार्ग काढू, असं आश्वासन शरद पवार यांनी दिलं. तसेच मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची जबाबदारी पवार यांनी घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मुख्यमंत्र्यांना फोन केला. शरद पवार यांच्या आश्वासनानंतर अखेर एमपीएससी विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतलं. पण काही जण आंदोलनाच्या पवित्र्यात कायम आहेत.
तुमचा प्रश्न मार्गी लागणार, असं आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिलं. शरद पवार यांच्या या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष सुरु केला. यावेळी शरद पवार यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. पण विद्यार्थ्यांचा जल्लोषाचा आवाज इतका मोठा होता की एवढ्या गर्दीत शरद पवार यांचा आवाज दूरपर्यंत पोहोचत नव्हता. पण विद्यार्थ्यांना आवाहन केल्यानंतर ते शांत झाले आणि शरद पवार बोलू लागले. विशेष म्हणजे शरद पवार यांनी आंदोलनस्थळावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला.
“विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आयोगाने काही बदल केलेला आहे, असं पत्र मला काल मिळालं. हे पत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सी. जी. पाटील यांनी लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं की, विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आपण स्वत: उपस्थित राहून मार्ग काढावं, असं पत्रात म्हटलं आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“मी फक्त एवढ्याचसाठी सांगतोय की, तुम्ही जसं आंदोलनाच्या माध्यमातून म्हणणं मांडत आहात तसंच म्हणणं कुलगुरुंनी लेखी मांडलं आहे”, असं शरद पवार यांनी सांगितलं. त्यानंतर विद्यार्थ्यांचा जोरदार टाळ्या वाजवण्याचा आवाज येतो.
“मी इथे येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. त्यांचं म्हणणं असं आहे की, तुमचे प्रतिनिधी, विद्यार्थ्यांचे कुलगुरु आणि आयोगाचे प्रतिनिधी यांच्यासोबत दोन दिवसात बैठक घेण्यास तयार आहेत. तुमच्यावतीने कोण येणार ते मला माहिती नाही. त्याची नावे तुम्ही मला द्यायची. मी बैठकीची जबाबदारी घेतो. मुख्यमंत्र्यांची बैठक होईल”, असं शरद पवार म्हणाले.
“ज्या अर्थी कुलगुरु मला लेखी देतात की विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यांच्या अभ्याक्रमात ऐनवेळी बदल करणं योग्य नाही हे कुलगुरु सांगत असतील तर त्याची नोद सरकारला घ्यावी लागेल”, असं शरद पवार म्हणाले.
आपल्याला मुख्यमंत्र्यासोबत बोलावलं लागेल. ती बैठक मी घडवून आणतो. मी स्वत: हजर राहतो. तुमच्यावतीने कोण येणार? असं शरद पवार यांनी विचारलं. त्यानंतर आंदोलक विद्यार्थ्याने पाच जणांची नावे सांगितली. त्यावर पवारांनी चौफेर बसलेल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला ही पाच नावे मान्य आहेत का? असं विचारलं. त्यावर सर्व आंदोलकांनी होकार दिला.
विशेष म्हणजे या आंदोलनस्थळी एका विद्यार्थ्याला आज संध्याकाळी भोवळ आल्याची माहिती समोर आली होती. आंदोलन करणारे विद्यार्थी हे सुशिक्षित आहेत. ते उद्याचे अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिलं जावं, अशी अनेकांची मागणी आहे. याच विचारातून अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील या आंदोलनाची दखल घेतल्याची माहिती समोर आली होती.