पुणे | 11 नोव्हेंबर 2023 : शासकीय सेवेचे अनेक तरुणांचे स्पप्न असते. आता हे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग दिला आहे. एसपीएससीमध्ये हजारो पदांची भरती होणार आहे. मंडळाने तब्बल २१ हजार जागांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी अनेक पदांच्या जाहिराती काढल्या आहे. तसेच डिसेंबर महिन्यांत अनेक पदांच्या जाहिराती निघणार आहे. आठ महिन्यांत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती एमपीएससी आयोगाने प्रभारी अध्यक्ष डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी दिली. यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या युवकांचे शासकीय सेवेचे स्वप्न साकार होणार आहे.
राज्य शासनाकडून मागणीपत्रे आल्यानंतर भरती प्रक्रिया आयोगाकडून सुरु करण्यात येते. गेल्या वर्षभरात अ, ब आणि अराजपत्रिक ब गटासह लिपिक पदांच्या भरतीसाठी तब्बल २१ हजार जागांची विविध विभागांकडून मागणी झाली. या पदांची भरती प्रक्रिया विविध टप्प्यांवर आहे. आठ महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर भरती झाली.
एमपीएससीमार्फत प्रथमच २१ हजार पदे भरली जात आहेत. गेल्या पाच वर्षांत २०१७-१८ मध्ये सर्वाधिक ९ हजार २०७ पदे भरली गेली होती. सर्वात कमी पदे २०१९-२० मध्ये भरली गेली. त्या वर्षांत ३ हजार ३६६ पदे भरली गेली. मागील दोन वर्षांत आठ हजार पदांची भरती झाली. २०२१ मध्ये ३,३९१ तर २०२२ मध्ये ४,५५७ पदे भरली गेली.
एमपीएससी भरतीत अ आणि ब गटात सर्वाधिक पदे वैद्यकीय शिक्षण विभागात भरली जाणार आहे. तब्बल २ हजार पदे भरली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागात १९००, वित्त विभागात १६०० गृह विभागात ११८४ तर सार्वजनिक आरोग्य विभागात ६७०७ पदे भरली जातील. एमपीएससीकडून आठ महिन्यांत ही भरती पूर्ण होईल. गेल्या तीन वर्षांत ६० हजार पदे निवृत्तीमुळे रिक्त झाली आहेत. तसेच आधीपासूनची पदे धरली तर हा बॅकलॉग दोन लाखांवर गेला आहे. तो या भरतीमुळे कितपत भरून निघेल, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी उपस्थित केला आहे.