मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : विकेण्डला मुंबईतून पुण्याला जाणाऱ्या वाहनचालकांनो सावधान, तुम्हाला ट्रॅफीक जामचा सामना करावा लागू शकतो. लोणावळा येथे गॅंट्रीच्या कामासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची पुण्याला जाणारी मार्गिका शुक्रवारी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे मार्गावर वाहतूकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुणे मार्गावर लोणावळा येथे मिसिंग लिंकची काम सुरु असल्याने हा ट्रॅफीक ब्लॉक घेण्यात आला आहे.
मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे वरील लोणावळा एक्झिट ( km number 54/225 ) उद्या 1 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे गॅंट्री उभारण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी पुण्याला जाणाऱ्या लेनची वाहतूक दुपारी 12 ते 2 या वेळेत बंद करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे एक्सप्रेस-वे 95 किमी लांबीचा असून राज्यातील दोन मोठ्या महानगरांना जोडतो. हा देशातील पहिला एक्सेस कंट्रोल एक्सप्रेस-वे असून तो साल 2002 पासून सुरु करण्यात आला आहे.
मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे वर दुपारी 12 ते 2 या दोन तासांसाठी पुण्याला जाणारा मार्ग गॅंट्री क्रेनच्या उभारणीसाठी दोन तास बंद राहणार आहे, त्यामुळे पुण्याला जाणाऱ्या वाहन चालकांनी खंडाळा घाटात या मार्गावरुन एक्झीट घ्यावी आणि जुन्या मुंबई – पुणे मार्गाने आपली वाहने वळवावी, त्यानंतर पुन्हा वळवण टोल प्लाझा येथून पुन्हा मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर प्रवेश करीत आपला प्रवास पुढे सुरु ठेवावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने गुरुवारी केले आहे.
पुणे – मुंबई एक्सप्रेस वे वर अपघात होण्याचे प्रमाण मोठे आहे. जाने ते जून 2023 दरम्यान या मार्गावर एकूण 135 वाहन अपघात झाले असून त्यातील 61 अपघात प्राणांकित होते तर एकूण या अपघातात सहा महिन्यात 81 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.