पुणे : एमपीएससी परीक्षा पास होऊनही त्याला नियुक्ती मिळाली नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केलीय, असा आरोप स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियांनी केला आहे. सरकारने जर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली असती तर आमच्या स्वप्निलने आत्महत्या केली नसती, असं म्हणत स्वप्निलच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. (My son suicide due to the government policy MPSC Swapnil Lonakar family Allegation)
“सध्या महाराष्ट्रमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यात कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडे मोडलं आहे. अशा परिस्थितीत आपली कमावती मुलं हा घरच्यांसाठी आधार असतो. पण अशा काळात जर सरकारच्या नाकर्तेपणामुळे कर्ती मुली सोडून गेली तर कुटुंबीयांनी काय करायचं? आम्ही तर म्हणू की सरकारच्या नाकर्तेपणामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केलीय”, असा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केलाय.
“गेली दोन वर्षे कोणतीच परीक्षा झाली नाहीये. विद्यार्थी आता हतबल झाले आहेत. विद्यार्थ्यांना एक प्रकारचं नैराश्य आलंय. त्यामुळे सरकारला आता तरी जाग आली पाहिजे. आज आपल्यातून एक स्वप्निल गेला… आमच्यावर जे संकट आलंय… ते इतर कुणावर यायला नको”, असं स्वप्निलचे कुटुंबीय म्हणाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. पीडित तरुण स्वप्नील लोणकरने पुण्यातील फुरसंगी येथे आत्महत्या केली. ही घटना 29 जून रोजी घडली.
कोरोनामुळं स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, अशी मागणी रोहित पवार यांनी ट्विट करुन सरकारकडे केली आहे.
स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्येनंतर विद्यार्थी चांगलेच पेटून उठले आहेत. ही आत्महत्या नव्हे तर हा व्यवस्थेने केलेला खून आहे, अशी तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. स्वप्निलने तर जीव दिला, आणखी किती जणांनी जीव द्यावा म्हणजे सरकारला जाग येईल, असे संतप्त सवाल विद्यार्थी करत आहेत.
(My son suicide due to the government policy MPSC Swapnil Lonakar family Allegation)
हे ही वाचा :
MPSC उत्तीर्ण, पण दीड वर्षांपासून नोकरी नाही; पुण्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या