पुणे, नागपूर | 18 ऑगस्ट 2023 : नागपूर विमानतळावरुन पुणे शहराकडे येणारे विमान तयार झाले होते. प्रवाशी विमानात बसण्यासाठी निघाले होते. विमानाचा पालयट आला होता. पायलट विमानतळाच्या बोर्डिंग गेटवर पोहचला अन् खाली कोसळला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे धावपळ उडाली. तातडीने त्या पायलटला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रथमदर्शनी मृत्यूचे कारण ह्रदयविकार म्हटले गेले.
इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन मनोज सुब्रमण्यम गुरुवारी नेहमीप्रमाणे कामावर आले होते. त्यांच्यावर नागपूर- पुणे या फ्लॅईटची जबाबदारी होती. वैमानिक नागपूरवरुन पुणे शहराला विमान घेऊन जाण्यासाठी तयार झाले होते. विमान बोर्ड होण्यापूर्वी ते बोर्डिंग गेटजवळ कोसळले. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
रुग्णालयातील सूत्रांनी मनोज सुब्रमण्यम यांच्या मृत्यूचे कारण ह्रदयविकार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. यासंदर्भात रुग्णालयाचे प्रवक्ते एजाज शमी म्हणाले की, सुब्रमण्यम यांचा मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर समोर येणार आहे.
दरम्यान वैमानिक मनोज सुब्रमण्यम यांच्या मृत्यूसंदर्भात इंडिगो कंपनीने दु:ख व्यक्त केले आहे. आमच्या संवेदना त्यांच्या परिवारासोबत असल्याचे इंडिगो प्रवक्ताने म्हटले आहे. रुग्णालयात नेताना मनोज सुब्रमण्यम यांचा मृत्यू झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
पायलटचा अचानक मृत्यू झाल्याचा हा आठवड्यातील तिसरा प्रकार आहे. त्यामध्ये दोन भारतीय पायलट आहे. यापूर्वी दिल्लीवरुन दोहा जणाऱ्या कतर एअरवेजचा वैमानिकाचा मागील आठवड्यात मृत्यू झाला होता. पायलटचा अचानक मृत्यू होण्याच्या प्रकारामुळे चिंता निर्माण झाली आहे. तसेच वैमानिकांची नियमित आरोग्य तपासणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आठवड्याभरीत तिसऱ्या वैमानिकाचा अचानक मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे नागरी विमानन मंत्रालयकडून काही मार्गदर्शक सूचना विमान कंपन्यांना दिल्या जाण्याची शक्यता आहे.