पुणे : पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा (Mahatma Phule Wada) येथील कमानीवर माजी नगरसेविकेच्या सासूच्या नावाचा फलक लागल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. महात्मा फुले मंडळ, ज्योती मित्र मंडळ आणि अखिल माळी प्रबोधन समितीने यावर आक्षेप घेतला आहे. यासंबंधी महापालिका आयुक्तांकडे (PMC Commissioner) तक्रार करण्यात आली आहे. नगरसेविकेची मुदत संपल्यानंतर हा फलक लावण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. कै. लक्ष्मीबाई नारायण हरीहर असा हा फलक (Board) लावण्यात आला आहे. तर विजयालक्ष्मी हरीहर असे माजी नगरसेविकेचे नाव आहे. या नामफलकाच्या कमानीवर आता संघटनांनी आक्षेप घेतला आहे. पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या कमानीवरील हा प्रकार आहे. दुसरीकडे कमानीवर नाव लावण्याचा विषय आम्ही नाव समितीत मंजूर करून घेतल्याचा हरीहर कुटुंबाचा दावा आहे.
महापालिकेतील नगरसेकांची मुदत उलटल्यानंतर 24 मे रोजी हा फलक लावला असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. शहरात अनेक चौकात, गल्लीत, रस्त्यावर नगरसेवकांनी आय लव्ह पुणे यासह मंदिर, मावळे, हमाल यासह विविध प्रकारचे शिल्प, पुतळे उभारले आहेत. पादचारी मार्ग, रस्ते अडवून स्मारके तयार केली आहेत. चौकांचे सुशोभिकरण केले आहे. त्या प्रत्येक ठिकाणी मोठ्या आक्षरात संकल्पना म्हणून संबंधित नगरसेवकांचे बोर्ड लावण्यात आले आहेत. यावर गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपये खर्च झालेले आहेत. 14 मार्च रोजी पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपली आहे, त्यानंतरही स्वतःच्या नावाने बोर्ड लावण्याचे प्रकार सुरू आहेत.
24 मे रोजी आता ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाजपाच्या माजी नगरसेविका विजयालक्ष्मी हरीहर यांच्या सासू ‘कै. लक्ष्मीबाई नारायणराव हरिहर’ यांच्या नावाचा फलक लावण्यात आला आहे. त्याखाली मार्गदर्शक म्हणून खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक यांचे नाव आहे. तर संकल्पना म्हणून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव आहे. त्याखाली विजयालक्ष्मी हरिहर, सम्राट थोरात, आरती कोंढरे व अजय खेडेकर या चार माजी नगरसेवकांची नावे आहेत. नगरसेविकेच्या सासूचे नाव फुले वाड्यावर लावण्यात आल्याने त्यावर महात्मा फुले मंडळ, ज्योती मित्र मंडळ, अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था यांनी आक्षेप घेतला आहे. याविरोधात काल महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.