पुणे | 12 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ससून रुग्णालयातील ड्रग्स रॅकेट प्रकरणाची चर्चा सध्या सुरु आहे. या प्रकरणाचे नाशिक कनेक्सन समोर आले होते. आता ड्रग्सचे जुन्नर कनेक्शन समोर आले आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जवळ असणाऱ्या एका गावात मुंबई येथील नार्कोटिक्स विभागाची टीम आली. या टीमने अमली पदार्थांचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई अतिशय गोपनीय पद्धतीने करण्यात आली. घटनास्थळाला सील लावण्यात आलेले आहे. पिंपळगाव गावातून वडगाव सहानी गावात जाणाऱ्या रोडलगत राजन वर्हाडी यांचे घर आणि शेती आहे. या घरालगत पत्र्याचे शेड आहे. या शेडमध्ये ड्रग्सचे साहित्य मिळाले आहे.
राजन वर्हाडी यांनी हे शेड सोमनाथ जाधव नावाच्या व्यक्तीला भाड्याने दिले असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. दरम्यान सोमनाथ जाधव हा फरार झाले असल्याचेही कळाले. मुंबई येथील नार्कोटिक्स विभागाच्यी टीमने काही दिवसांपूर्वी नाशिक येथे एका कारखान्यावर कारवाई केली होती. ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील यांचा हा कारखाना होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा मिळाला. सुमारे ३०० कोटींचा मेफेड्रॉनसाठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता वडगाव सहानी येथे हा प्रकार उघड झाला आहे.
ड्रग रॅकेट आरोपी ललित पाटील नुकताच ससून रुग्णालयातून फरार झाला. ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला आहे. या प्रकरणी त्याचा भाऊ भूषण पाटील याला अटक करण्यात आलेली आहे. तसेच अभिषेक बलकवडे यालाही अटक करण्यात आली आहे. आता ललित पाटील याचा जुन्नर कनेक्शन असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान वडगाव सहानी येथील कारवाईची अद्यापही माध्यमांना माहिती दिली नाही.
वडगाव सहानी येथे मुंबई येथील टीमने सुमारे २६ किलो अल्प्राझोलम आणि इतर कच्चा माल जप्त केल्याचे समजते. अल्प्राझोलम हे मानसिक विकारांमध्ये वापरले जाते. त्यामुळे गुंगी येत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.