पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi mandir) यांचं पुण्यात (Pune) उभारण्यात आलेलं मंदिर हटवण्याचे आदेश भाजप मुख्यालयातून दिल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात औंध परिसरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मयूर मुंडे (Mayur Mundh) आणि त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे इतर कार्यकर्त्यांनी हे मंदिर उभारलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रचंड प्रेम आणि आदर या भावनेतून छोटं मंदिर उभारण्यात आलं होतं. मात्र आता ते हटवण्यात आलं आहे. अशा प्रकारची भावना जगभरात करोडो भारतीय नागरिकांना पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारण्यामागची भावना फार चांगली होती आणि आहे. परंतु काल भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन आला आणि जिवंत व्यक्तीचे अशाप्रकारे मंदिर बांधून पूजा करणे हे भारतीय जनता पार्टीच्या तत्वाला आणि विचाराला अनुसरून नाही, असं सांगितलं. त्यामुळे आपल्या मनामध्ये माननीय पंतप्रधानांबद्दल असलेल्या भावना रस्त्यावर मंदिर बांधून जाहिरातरित्या व्यक्त न करता, त्या भावना मनातच ठेवल्या जाव्यात. त्यानुसार कृती आणि कार्य करावे असे सांगण्यात आलं. त्यामुळे आम्ही त्या मंदिरातील पुतळा हलवला आहे” असं मयूर मुंडे यांनी सांगितलं.
भाजपचे औंधमधील कार्यकर्ते मयूर मुंडे यांनी 15 ऑगस्टला मोदींचे मंदिर तयार केले होते. सोशल मीडियात या मंदिराची जोरदार चर्चा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवाच्या रुपात मालं होतं. मोदींना देवसारखं मानून दर्शनही घेतलं जात होतं. मयूर मुंडे यांनी स्वत:च्या जागेत हे मंदिर उभारलं होतं. या मंदिरात मोदींचा मार्बलसदृश्य पुतळा ठेवण्यात आला. हा पुतळा राजस्थानातून बनवून आणला होता. 15 ऑगस्टला या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र नंतर रातोरात ते हटवण्यात आलं.