प्रदीप कापसे, Tv9 प्रतिनिधी, पुणे | 1 फेब्रुवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने सगेसोयरेबाबतच्या मागण्या मान्य केल्याने छगन भुजबळ यांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. “छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत असतील, मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा”, अशी खोचक टीका संजय गायकवाड यांनी केली. त्यांच्या या टीकेला अगदी तशाच शब्दांत उत्तर रुपाली पाटील यांच्याकडून देण्यात आलं आहे.
रुपाली पाटील यांनी संजय गायकवाड यांच्यावर जहरी टीका केली. “संजय गायकवाड यांना अशी वक्तव्य करायला रोखलं पाहिजे. अन्यथा त्यांचे पाय उखडून टाकायला कार्यकर्ते खंबीर आहेत. छगन भुजबळ हे कशाला पाहिजे? तुम्हाला जशास तसं उत्तर मिळेल. तू आमदार तुझ्या घरी, बोलताना नीट बोललं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पेकाटात लाथ घालून हाकलून दिलं पाहिजे. अन्यथा सत्तेतील कुस्ती लोकांना पाहायला मिळेल”, असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला. “जर संजय गायकवाड यांनी शिव्या दिल्या तर डबल शिव्या द्या”, असा सल्ला रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी देखील संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. “संजय गायकवाडांचे वक्तव्य संतापजनक आहे. त्यांचे वक्तव्य चुकीचं आहे. गायकवाडांना भावना मांडण्याचा अधिकार आहे. पण गायकवाडांची भाषा योग्य नाही. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी दखल घेऊन कारवाई करावी”, अशी विनंती तटकरे यांनी केली. “भुजबळांची भूमिका ठाम आहे. पण आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे पाहावं लागेल”, असंदेखील तटकरे म्हणाले.