पुणे | 2 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सविस्तर पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आणि त्यांच्या गटातील नेत्यांकडून भाजप पक्षासोबत जाण्याबाबत वेगवेगळे गौप्यस्फोट कर्जत येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात करण्यात आला. त्या गौप्यस्फोटांना शरद पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत सविस्तर उत्तरे दिली. “अजित पवार जे काही बोलले त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच समजल्या. त्यांच्या बोलण्यात काही स्फोट होता का, वाव होता का, बॉम्ब होता का फटकडा होता का या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल”, असं शरद पवार म्हणाले. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या अध्यक्षपदाबाबतच्या राजीनाम्याबाबत जे गौप्यस्फोट केले त्यावरही शरद पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली.
“मी राजीनामा देतो म्हणायचं कारण काय? पक्षाचा अध्यक्ष मी होतो. सामूहिक निर्णय झाला होता. सामूहिक निर्णयासोबत आम्हाला जायचं होतं”, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं. “मी राजीनामा दिला तर परत करायचा असेल तर मला आनंद परांजपे किंवा जितेंद्रची परवानगी घ्यायची गरज नाही. मला यांना बोलावून सांगायची गरज नव्हती. माझा निर्णय घेण्याची कुवत माझ्यात आहे. राजीनामा देण्याचा प्रश्नच नव्हता. आमच्यात वेगवेगळ्या गोष्टीच्या चर्चा होत्या. पण कुणाला तरी सांगू राजीनामा देतो अशी स्थिती नव्हती”, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं.
“माझ्याकडून कधीच बोलावणं गेलं नव्हतं. मी पक्षाचा अध्यक्ष होतो. कोणताही सदस्य माझ्याशी सुसंवाद ठेवू शकत होता. चर्चा झाली होती. पण ते ज्या झटक्याने भाजपसोबत जाण्याचा विचार करत होते. तो विचार जनमाणसात जे शब्द दिले त्याच्याशी सुसंगत नव्हता. आम्ही विधानसभेत मतं मागितली ती भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. एका विशिष्ट कार्यक्रमासाठी होती. भाजपच्या विरोधात होती. आमचे लोक ज्या कारणाने निवडून आले त्याला लोकांचा पाठिंबा होता”, असं शरद पवार म्हणाले.
“आमच्या शिवसेना आणि भाजपचया भूमिकेबाबत फरक आहे. आमची शिवसेनेबाबतची भूमिका वेगळी आहे. आमची आजही भूमिका भाजपविरोधी आहे. तितकी शिवसेना विरोधी नाही. शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र बसून सरकार बनवण्याचा कार्यक्रम घेतला होता. आज जे विरोध करत आहेत. ते त्या चर्चेत होते. पदावर आरूढ होते. हा फरक आहे”, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
अजित पवार यांनी बारामतीतही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “संसदीय लोकशाहीत कोणताही पक्ष आपला कार्यक्रम घेऊन कोणत्याही मतदारसंघात जाऊ शकतो. बारामती असो की अन्य मतदारसंघ असो. तिथे अन्य पक्षाचे लोक तिथे जाऊन भूमिका मांडू शकतात. त्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली तर त्यात तक्रार करण्याचं कारण नाही”, असं शरद पवारांनी उत्तर दिलं.