पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणाबाबत महत्त्वाचं विधान केलंय. “आरक्षणासाठी संघर्ष व्हायचे पण आता आरक्षण-आरक्षण बास झालं”, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. नव्या पिढीचं अर्थकारण बदलेपर्यंत स्थान बदलणार नाही, असंही ते म्हणाले. संभाजी बिग्रेडने आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी तरुणांना मार्गदर्शन केलं.
“एक काळ होता की आरक्षणासाठी संघर्ष केला, मागण्या केल्या. पण आता हा विचार केला की, आता आरक्षण-आरक्षण बास झालं, जोपर्यंत नव्या पिढीचं अर्थकारण बदलत नाही तोपर्यंत समाजातील त्यांचं स्थान बदलणार नाही”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
“अर्थकारणाची दिशा दाखवणारं एक चर्चासत्रे इथे झाले. त्यातील एक चर्चासत्र हे आरक्षणातून अर्थकारणाकडे होतं. या सगळ्या क्षेत्रात जे यशस्वी झाले अशा तुमच्यातील काही सहकाऱ्यांना बोलवून त्या सगळ्यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही अतिशय चांगली गोष्ट आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“आज मराठा म्हटल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात. काही लोकं वेगळ्या दृष्टीने बघतात. मराठा याचा विचार करताना मराठी माणूस, समाजातला उपेक्षित माणूस, समाजातील कष्टकरी माणूस असं चित्र आपल्यासमोर येतं. मराठ्याचं वैशिष्ट्य म्हणजे विविध जातीच्या समाजाला सोबत घेऊन आपल्याबरोबर त्यांची उन्नती कशी होईल याचा विचार करणारा वर्ग म्हणजे तो मराठा”, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ
शरद पवारांनी दिली काँग्रेस भवनला भेट
दरम्यान, शरद पवार आज तब्बल 24 वर्षांनंतर काँग्रेस भवनला गेले. काँग्रेसच्या 137 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते काँग्रेस भवनात गेले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाबद्दलही महत्त्वाचं विधान केलं.
“इथून कॉंग्रेसच्या नेत्यांनी इंदिरा गांधीच्या माध्यमातून नेहरुंना कन्व्हीन्स केलं आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामधे पुण्यातील कॉंग्रेस भवनचे योगदान मोठे आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“काही लोक कॉंग्रेसमुक्त भारत करायचं म्हणतात. पण कॉंग्रेस मुक्तभारत होऊ शकत नाही. कॉंग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. कॉंग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील, माझेही काही आहेत, पण कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागेल”, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.