पुणे | 27 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध भागातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. जनतेची नेमकी काय भावना आहे ते त्यांनी जाणून घेतलं. त्यानंतर शरद पवार यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील सध्याच्या विविध घडामोडींवर, त्यांच्यावर सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. विशेष म्हणजे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं शरद पवार यांच्यासोबत नातं जोडलं जात आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे शरद पवार असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. विशेष म्हणजे एका नेत्याने शरद पवार हे मनोज जरांगे यांना लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचा दावा केलाय. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी संबंधित नेत्यावर खोचक शब्दांत टीका केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील घडामोडींविषयी सुद्धा माहिती दिली.
भाजप नेते आशिष देशमुख यांनी शरद पवार हे मनोज जरांगे यांना लोकसभेची उमेदवारी देणार, असा दावा केलाय. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हसत उत्तर दिलं. “आमच्यावर अशी इतकी वेळ आली?” असा उलटप्रश्न शरद पवारांनी केला. “कोण म्हटलं?”, असा प्रश्न शरद पवार यांनी केला. त्यावर पत्रकारांनी आशिष देशमुख यांचं नाव सांगितलं. त्यानंतर शरद पवारांनी आशिष देशमुखांवर टीका केली. “त्यांना मेंदू मर्यादीत आहे. त्यांच्याबद्दल काय बोलायचं?”, अशी टीका शरद पवारांनी केली.
“राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आम्ही सर्वांनी एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष इतरांसोबतसुद्धा आमची सुरु आहे. एकत्रित येऊन भाजप विरोधात पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षानेदेखील सहभागी व्हावं. अंतर्गत चर्चा करण्यासाठी आजच बैठक होती. त्या बैठकीत काय झालं याची माहिती मला नाही. कारण मी इथे आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमचे काही सहकारी बोलले. त्यांच्याकडून सुचवलं गेलं की, आजच्या दिवशी पुण्याला जाहीर सभा आहे. त्यामुळे ते आमच्यासोबत चर्चा करायला येऊ शकले नाहीत. त्यांच्यासोबतची चर्चा उद्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
“लोकांना पर्याय हवा आहे. आम्ही सकाळपासून बारामती लोकसभा मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधतोय. प्रत्येक मतदारसंघाचे कमीत दीडशे-दोनशे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी हे सर्व एकत्रित आहेत. त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वसामान्य मतदाराला पर्याय पाहिजे, अशी माहिती आमच्या सहकाऱ्यांकडून मिळाली. ही जनतेची इच्छा असली तर राजकीय पक्ष म्हणून आमची ती पूर्ण करायची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही अन्य पक्षांसोबत एकत्रित बसण्याचा निर्णय योग्य आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“अनेकांनी सांगितलं की, काही लोकांकडून दमदाटीचे फोन येत आहेत. काही निमशासकीय कर्मचारी उदारणारी शिक्षण संस्थेत किंवा सरकारी संस्थेत काम करणारे, त्यांना नोकरीवरुन मुकावं लागेल, अशाप्रकारची धमकी दिली जातेय, असं लोकांनी सांगितलं. आम्ही त्यांना सांगितलं की, प्रत्यक्ष असं घडलं असेल तर त्याची माहिती आम्हाला द्या. आम्ही खोलापर्यंत जाऊ. आम्ही कार्यकर्त्यांना विश्वास देऊ इच्छितो. कुणी दमदाटी केली, कुणी दबाव टाकण्याता प्रयत्न केला तर आम्ही सर्वजण त्या कार्यकर्त्याच्या पाठिशी आहोत. तुम्ही काही चिंता करु नका. तुम्ही एकटे नाहीत”, अशा विश्वास शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.