पुणे | 16 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आणखी काही दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी कार्यक्रमाला आलेल्या इंजिनीयरींगच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. इंजिनीयरमध्ये काय ताकद असते, याविषयी शरद पवार पटवून देत होते. यावेळी त्यांनी हुंदाई कार कंपनी महाराष्ट्रातून तामिळनाडूमध्ये कशी गेली? याबाबतचा किस्सा सांगितला.
अभियंत्यांमध्ये खूप क्षमता आहे. त्यांनी ठरवलं तर देशाला जगाच्या कोणत्या शिखरावर नेवून पोहोचवतील याचा नेम नाही. यावेळी त्यांनी एका प्रख्यात इंजियिनयरचं नाव घेतलं ज्यांनी एक मोठ्या कार कंपनीचं इंजिन तयार केलं. संबंधित अभियंता हा हुंदाई या कार कंपनीचा निर्माता असल्याचं त्यांनी सांगितलं. “मी बारामतीला एक म्युझियम केलेलं आहे. त्या म्युझियममध्ये त्यांचे फोटो दिसतील”, असं शरद पवार यांनी सांगितलं.
“त्या इंजिनीयरने मला सांगितलं. मी इंजिन का तयार करु नये? असं वाटलं. त्यांनी इंजिन तयार केली. त्यानंतर त्यांनी इंजिन तयार केल्यानंतर कंपनी उभी केली. त्यांनी मला सांगितलं की, मिस्टर पवार एकेदिवशी तुम्ही बघाल, आमच्या कंपनीच्या कार्सचा तुमच्या देशात सहज वावर होताना तुम्हाला दिसेल. विशेष म्हणजे आमच्या कंपनीची गाडी भारता इतकीच अमेरिकेतही लोकप्रिय असेल. त्या कंपनीचं नाव हुंदाई आहे. आज हुंदाई कुठच्या कुठे गेली”, असं शरद पवार म्हणाले.
“मी त्यांना सांगितलं की, तुझी कंपनी महाराष्ट्रात काढा. मी त्यांना इथे आणलं. जागा दाखवल्या. त्यांना त्या जागा पसंत पडल्या. पण नंतर राजकीय स्थिती सोईची नव्हती. मी नावं घेत नाही. त्यावेळी जे राजकारणी होते त्यांचा वेगळा दृष्टीकोन होता. हा दुसरीकडून आला. काही धंदा करायचं म्हणतोय. मग आपल्याला काय देणार? अशी चर्चा होऊ लागली. त्यामुळे मी पटकन मागे सरकलो आणि ठरवलं इथे काम करायचं नाही”, असं शरद पवार यांनी सांगितलं.
“पण ही कंपनी भारतात कुठेना कुठे यायला पाहिजे, असं वाटत होतं. त्या काळात मी तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांना फोन केला. त्यांना सांगितलं एका गृहस्थाला घेऊन येतोय. आम्ही चेन्नईला गेलो आणि जयललिता यांनी एका दिवसात पाहिजे तेवढी हजरा एकर जमीन दिली, सवलती दिल्या आणि आज हुंदाई कंपनी त्या ठिकाणी गेली”, असा किस्सा शरद पवारांनी सांगितला.