पवार कुटुंबातील आणखी एक चेहरा बारामतीच्या राजकारणात सक्रिय, नेमकी रणनीती काय?

| Updated on: Aug 29, 2023 | 7:52 PM

बारामतीच्या राजकारणात सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून कोणकोणत्या उमेदवारांना संधी दिली जाणार याबाबत चर्चा सुरु असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

पवार कुटुंबातील आणखी एक चेहरा बारामतीच्या राजकारणात सक्रिय, नेमकी रणनीती काय?
Follow us on

बारामती | 29 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुतणे अजित पवार यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. त्यामुळे राजकारणात प्रसिद्ध असलेली काका-पुतण्याची ही जोडी एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली आहे. अर्थात ते एकमेकांचे सध्या राजकीय विरोधक आहेत. पण पवार कुटुंबियांचं एकमेकांशी घनिष्ठ नातं आहे. पवार कुटुंबाची नेहमी चर्चा होत असते. आता याच कुटुंबातील आणखी एक चेहरा बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याची माहिती आहे.

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले होते. त्यानंतर आता अजित पवार यांचे लहान चिरंजीव जय पवार हे देखील राजकारणात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आपले पिता अजित पवार यांनी ग्रीन सिग्नल दिल्यास आपण राजकारणात सक्रिय होऊ, असं सूचक वक्तव्य जय पवार यांनी केलं आहे. जय पवार यांचा याबाबतचा एक व्हिडीओ समोर आलाय. त्यामध्ये ते याबाबत महत्त्वाचं वक्तव्य करत आहेत.

व्हिडीओ नेमकं काय आहे?

“सगळ्या युवकांची इच्छा आहे, तुम्ही पण राजकारण यावं. दादा आम्हा सर्व युवकांना तुम्ही राजकारणात पाहिजेत”, अशी विनंती राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने केली. त्यावर जय पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. “एकदा तुम्ही दादांशी बोला, दादांकडून ग्रीन सिग्नल मिळाला की मी इथेच आहे”, असं जय पवार म्हणाले.

जय पवार बारामतीत सक्रिय

अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते नुकतंच बारामतीत दाखल झाले होते. यावेळी अजित पवार यांचं बारामतीत राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं होतं. अजित पवार यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार यांची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी अजित पवार यांना नागरी सत्कार देवून सन्मानित करण्यात आलं होतं.

अजित पवार यांच्या सत्कारानंतर जय पवार हे बारामतीत सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे. जय पवार यांनी बारामती शहर कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अजित पवार यांनी ग्रीन सिग्नल दिल्यास आपण राजकारणात काम करु, असं स्पष्ट वक्तव्य जय पवारांनी केलं. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.