Jayant Patil | ईडीची पुन्हा नोटीस आली का? जयंत पाटील म्हणाले….

| Updated on: Sep 15, 2023 | 8:36 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना आज ईडीच्या नोटीसबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. विशेष म्हणजे त्यांनी आज राज्यातील सध्याच्या विविध घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली.

Jayant Patil | ईडीची पुन्हा नोटीस आली का? जयंत पाटील म्हणाले....
Follow us on

पुणे | 15 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीची पुढची रणनीती काय असेल याबाबत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. विशेष म्हणजे त्यांनी सरकारकडून कंत्राटी भरतीबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची टीका करण्यात आली. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आगामी काळात आंदोलनही करेल, असं ते म्हणाले. तसेच निवडणूक आयोगाच्या येत्या 6 ऑक्टोबरच्या सुनावणीत काय भूमिका मांडू, याबाबतही त्यांनी भाष्य केलं.

येत्या 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता, “आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की, पक्षात फूट नाही. आमची बाजू ऐकून घ्यावी. पण आमची बाजू ऐकून न घेता निवडणूक आयोगाने ही पक्षात फूट आहे, असं एकदम जाहीर केलेलं आहे. याबाबतीत आम्ही आता वकिलांचा सल्ला घेतोय. मला आज त्यावर काही बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

कंत्राटी भरतीवर जयंत पाटील काय म्हणाले?

“महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात तिथे कंत्राटी कर्मचारी नेमणं चुकीचं आहे. जबाबदारीची पदे सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरली तर ते अतिशय गंभीर आहे. पैसे वाचवण्यासाठी सरकारने बेभरवशाच्या लोकांना तात्पुरत्या सेवेत घेऊन त्यांच्याकडून काही कामं करुन घेतली. त्यात चुका निष्पन्न झाल्या तर त्याचा भुर्दंड जनतेला बसू शकतो”, असं जयंत पाटील म्हणाले.

“कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती अत्यंत आवश्यक असेल अशा जागी केली तर ठीक आहे. पण त्यालाही काही मर्यादा असल्या पाहिजेत. नाहीतर हळूहळू आपण सरकारच कंत्राटी पद्धतीने चालवायला लागू. त्यातला दुसरा दोष असा आहे, ज्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करतो ते वर्ष-दीड वर्षाने संघटना बांधतात, त्यांची आंदोलने सुरु होतात आणि काम बाजूला राहतं. अशी काही वेगळी क्लिष्ट प्रश्न आहेत”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

“महाराष्ट्रातील तरुणांना सरकारी सेवेची आवश्यकता असते किंवा गरज असते. हजारो, लाखो युवक आपली परीक्षा देत असतात. आपल्याला शाश्वत नोकरी मिळेल, असं वाटत असतं. शेवटी नाईलाजाने त्यांना कंत्राटी कामावर बसावं लागतं. कंत्राटी कामावर गेलेल्या युवकाचं आयुष्य कायम अधांतरी असतं. कंत्राटी स्वरुपाच्या नोकऱ्या कमी होणार नाहीत याची काळजी सरकारने देखील घेतली पाहिजे”, असं जयंत पाटील म्हणाले.

ईडीच्या नोटीसचं काय झालं?

जयंत पाटील यांना काही दिवसांपूर्वी ईडीने नोटीस पाठवली होती. या नोटीसनंतर ईडीकडून काही कारवाई झाली का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “ईडीच्या कारवाया चालू आहेत किंवा चालू असतात. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या केसेस असतात त्याप्रमाणे येत असतात. त्यामुळे नोटीस थांबल्यात असंही म्हणता येत नाही. नक्की काय आहे हेही माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया दिली.