पुणे | 15 सप्टेंबर 2023 : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना प्रचंड वेग आलाय. प्रत्येक पक्षाच्या गोटात हालचालींना वेग आलाय. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. विशेष म्हणजे हा संघर्ष आगामी काळात जास्त तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून तयारी सुरु झालीय. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत.
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची नुकतीच दिल्लीत बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील ‘6 जनपथ’ या निवासस्थानी ही बैठक पार पडली होती. या बैठकीच्या एक दिवस आधी मुंबईत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी गेले होते. यावेळी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली होती.
या बैठकीत इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी या बैठकीच्या आतली बातमी सांगितली आहे. कारण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोन्ही नेते शरद पवार यांच्या घरी गेले तेव्हा जयंत पाटील हे देखील तिथे होते. यावेळी या चारही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. यावेळी झालेल्या चर्चेची माहिती जयंत पाटील यांनी आज दिली.
जयंत पाटील यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोन्ही नेते शरद पवार यांना भेटले. या बैठकीत वज्रमूठ सभांबद्दल चर्चा झाली. वज्रमूठ सभा पुन्हा सुरु होतील. या बैठकांचं आता नियोजन होणार आहे. काही सभा एकत्रित वज्रमूठ सभा होतील. तर काही राष्ट्रवादी म्हणून शरद पवार यांच्या वेगळ्या सभा होतील”, अशी महत्त्वाची माहिती जयंत पाटील यांनी दिली.
“ठाण्याला आमच्या वज्रमूठची सभा होणार आहे, असा अंदाज आहे. तिथल्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन सभा ठरवणार आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी स्थानिक नेत्यांशी बोलून निर्णय घेण्याचं ठरवलं आहे”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे वज्रमूठ सभा बंद झाल्या होत्या. त्यानंतर अजित पवार यांच्या बंडाची घटना घडली. या दरम्यानच्या काळात वज्रमूठ सभा झाल्या नाहीत. पण आता पुन्हा या सभा होणार आहेत.