विनय जगताप, पुणे | 21 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार निलेश लंके यांनी पवार कुटुंबियांनी पुन्हा एकत्र यावं, अशी इच्छा व्यक्त केलीय. आमदार निलेश लंके हे त्यांच्या अहमदनगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील 8 हजार मुस्लिम बांधावांसोबत खेड शिवापूर येथील हजरत कमरअली दुर्वेश दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. विशेष म्हणजे यावेळी त्यांना आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीत खासदारकीचा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न लंके यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक वक्तव्य केलं.
निलेश लंके यांनी यावेळी दर्गा दर्शनावरही प्रतिक्रिया दिली. “मी गेल्या 8 वर्षांपासून मतदारसंघातील नागरिकांना नवरात्रीमध्ये मोटा देवी दर्शनाला घेऊन जात असतो. ह्या वर्षी दीड लाख नागरिकांना नेले होते. ह्या वर्षी मतदार संघातील मुस्लिम महिलांनी मागणी केली की, आम्हाला दर्शनासाठी खेड शिवापूरच्या दर्ग्या येथे जायचं आहे. त्यासाठी हे आयोजन केलं आहे, असं निलेश लंके यांनी सांगितलं. आमदार मतदारसंघाचा कुटुंबप्रमुख असतो आणि कुटुंबातील लोकांच्या इच्छा पूर्ण करणं हे त्याचं कर्तव्य असतं”, असं निलेश लंके यावेळी म्हणाले.
निलेश लंके यांना यावेळी लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. निलेश लंके आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातून निवडणूक लढवणार, अशी चर्चा आहे. याबाबत निलेश लंके यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक वक्तव्य केलं. “राजकारण आणि माझ्या सोशल अॅक्टिव्हिटीचा काही संबंध नसतो. मी इच्छेसाठी कुठली गोष्ट करत नाही. राजकारण हे कधी ठरवून होत नसतं, वेळेनुसार निर्णय घ्यावा लागतो. ऐनवेळी राजकारणात निर्णय घ्यावा लागतो”, असं सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केलं.
यावेळी निलेश लंके यांना राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्ह आणि नावावरील सुनावणीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. “मी ह्या प्रक्रियेतला शेवटचा घटक आहे. त्यामुळे या विषयावर न बोललेलं बरं”, असं निलेश लंके म्हणाले.
यावेळी निलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मलाच काय, उभ्या महाराष्ट्रला वाटतं पवार फॅमिलीने एकत्र यावं”, असं उत्तर दिलं.
यावेळी त्यांना मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. “राजकारण न करता सर्व समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे. कोण काय म्हणालं, कुणाचे विचार कायं, प्रत्येकाचे विचारसरणी वेगवेगळी असते, त्यामुळे या मुद्द्यावर नं बोललेलंच बरं”, असं निलेश लंके म्हणाले.