पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या विरोधी भूमिका घेत अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) चौकशीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी देशातील बड्या उद्योगपतींना लक्ष्य करण्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुद्द्यावरही आपले परखड मत मांडले. यावेळी त्यांनी आपले जुने अनुभव सांगितले. एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी विरोधकांकडून उद्योगपतींना लक्ष करण्याचा फंडा जुनाच असल्याचे सांगितले.
राहुल गांधी यांच्या विरोधात भूमिका
संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दोन्ही टप्प्यांमध्ये अदानी प्रकरणातील जेपीसी चौकशीचा मुद्दा राहुल गांधी यांनी लावून धरला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी जेपीसी नको तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची समिती नेमावी, असं म्हटलंय. जेपीसीने तिढा सुटणार नाही. कारण जेपीसीत सत्ताधारी पक्षाचे बहुमत असेल तर सत्य कसे बाहेर येईल, असे पवार म्हणाले.
‘टाटा-बिर्ला’ ते ‘अदानी-अंबानी’
शरद पवार यांनी उद्योगपतींचा वापर राजकारणासाठी होणे दुर्देवी असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, ‘टाटा-बिर्ला’बाबत यापूर्वीही चर्चा झाली आहे.देशात अनेक वर्षांपासून हे घडत आहे. मला आठवते, अनेक वर्षांपूर्वी मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा सरकारच्या विरोधात बोलायचे झाले तर टाटा-बिर्लांविरुद्ध बोलत होतो.लक्ष्य सरकार होते? पण त्यासाठी माध्यम टाटा-बिर्ला वापरत होतो. परंतु जेव्हा आम्हाला टाटांचे योगदान समजले तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले. आम्ही टाटा-बिर्लांचा असा वापर का करत आहोत? हा प्रश्न पडला होता. पण कुणाला तरी टार्गेट करायचे होते म्हणून टाटा-बिर्ला टार्गेट करत होतो.
आज अंबानी, अदानी
आज टाटा-बिर्ला यांच्याऐवजी दुसरे टाटा-बिर्ला म्हणजे अंबानी अन् अदानी विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.पण आम्ही ज्या लोकांना टार्गेट करत आहात, त्यांनी काही चुकीचे केले असेल, सत्तेचा गैरवापर केला असेल, तर त्यांच्याविरोधात बोलण्याचा 100 टक्के अधिकार आहे. परंतु काहीच कारण नसताना त्यांच्यांवर टीका करणे मला समजत नाही.
काय हे नको होते
शरद पवार म्हणाले, देशात आज पेट्रोकेमिकल क्षेत्रात अंबानी यांनी योगदान दिले आहे. त्याची देशाला गरज नव्हती का? अदानी यांनी वीज क्षेत्रात योगदान दिले आहे, देशाला वीज नको का? हीच माणसे अशी जबाबदारी घेऊन देशासाठी काम करतात. त्यांचे काही चुकले असेल तर तुम्ही हल्ला करा, पण त्यांनी या पायाभूत सुविधा निर्माण केली केल्या आहेत, त्यावर टीका मला योग्य वाटत नाही.