विनय जगताप, पुणे | 25 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या धोरणावर घणाघात केला. शिंदे-फडणवीस-पवार या महायुतीच्या सरकारच्या धोरणाला लकवा झाला असल्याचा हल्ला त्यांनी केला. सरकारचे धोरण शेतकरी आणि गरिबांसाठी मारक असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आज निवडणुका झाल्यास काय असणार परिस्थिती या इंडिया टुडे सी व्होटरचा या सर्व्हेवर त्यांनी मत मांडले.
राज्य सरकारची पॉलीसी निश्चित नाही. पॉलीसीमध्ये वारंवार बदल केला जात आहे. थोडक्यात राज्याच्या पॉलिसीला पॅरलेसिस झालेला आहे. महायुतीचे हे सरकार श्रेय वादात अडकले आहे. श्रेयवादात हे सरकार इतके व्यस्त झाले आहे की, त्यांना सर्व सामान्य आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास वेळ नाही. यामुळेच राज्यात कांदा, टोमॅटो यानंतर आता साखरेचा नवीन प्रश्न उभा राहिलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसमोर हे खूप मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सरकारचे निर्णय कोण घेत आहे, हे मला कळत नाही. दिल्लीमधून एक निर्णय होतो. परंतु तो निर्णय राज्यातील शेतकऱ्यांना मारक ठरतो. देशात कार्पोरेट टॅक्स 25 टक्के आहे. आयकर जास्तीत जास्त 30 टक्के आहे. परंतु शेतकऱ्यांच्या कांद्यावर मात्र 40 टक्के कर लावला जात आहे. कांदा पिकवणारा शेतकरी अल्प भूधारक आहे. तो कमी पाण्यात पीक घेतो. त्या शेतकऱ्याला 40 टक्के टॅक्स लावला जात आहे. ही शेतकऱ्यांची थट्टाच आहे.
यंदा राज्यात पुरेसा पाऊस नाही. अनेक ठिकाणी पावसाने सरासरी गाठली नाही. महाराष्ट्रात शेतकऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांची कर्ज सरसकट माफ करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
इंडिया टुडे सी व्होटरचा सर्व्हे आमच्यासाठी खूप समाधान देणार आहे. राज्यात आमच्या जागा वाढलेल्या दिसत आहेत. त्यापेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील. परंतु राज्य सरकार निवडणुका घेण्यास घाबरत आहेत. त्यांना पराभवाची भीती वाटत आहे. मायबाप जनता त्यांना जागा दाखवणार आहे.