सुनील थिगळे, मांडवगण फराटा, शिरूर, पुणे | दि. 4 मार्च 2024 : मी जरी कडू बोलत असलो तरी शब्दाचा पक्का आहे. मागच्या वेळी मीच अमोल कोल्हे यांच्यासाठी मत मागायला तुमच्याकडे आलो होतो. त्यांचे वकृत्व चांगलं होते. दिसायला राजबिंडा आहे. त्यावेळी मी सांगितलं म्हणून तुम्ही अमोल कोल्हे यांना निवडून दिलं. पण आता तो बाबा काही दिवसांनी राजीनामा द्यायचं म्हणत होते. ते म्हणाले होते, मी अभिनेता आहे, मला मतदारांना वेळ देता येईना. माझ्या क्षेत्रात माझं नुकसान व्हायला लागलं. मुळात कोल्हे यांचं राजकारण हे पिंड नाहीच. त्यानंतर शिवजयंतीला मला शिवनेरी किल्ल्यावर भेटले. मी बोललो, ‘काय हो डॉक्टर मागे तर राजीनामा द्यायला निघाले होते. आता पुन्हा दंड थोपटताय’ तर ते म्हणाले, आता पुन्हा इच्छा झाली आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडवगण फराटा येथे सांगितले.
आम्हाला उमेदवार भेटला नाही की आम्ही कलाकाराला उभं करतो, अमोल कोल्हे त्यापैकीच एक आहे. राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चन हे ही निवडून आले. मग त्यांनी राजीनामा दिला. पण त्यांना मतदारांचे काही पडलेलं नसतं. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहेच. समाजातला असा कुठलाही घटक राहता कामा नये. आपल्या विचाराचा खासदार आपण निवडून दिला गेला तर आपल्याला काम व्हायला मदत होणार आहे. विरोधी पक्षाचा खासदार केला की नुसता तलवार काढतो आणि नुसता लढत बसतो. ते ही नाट्य प्रयोगातून, असे अजित पवार यांनी म्हटले.
लोकसभेच्या निवडणुकीवेळी खासदार कोल्हे म्हणतील, आता यापुढं मी काम करेन. बघा आत्ता ही त्यांचे नाटकाचे प्रयोग सुरु आहेत. त्यातून ते वातावरण निर्मिती करत आहेत. ही तात्पुरती आहे. महाराजांचा इतिहास आपल्याला जपायचा आहे, पण कोल्हे यांनी पाच वर्षे काय केलं, याचा ही विचार करा. तुळापूरच्या कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे कानात मला म्हणाले, दादा माझे नाटक आहे. मला निलेश लंके यांच्या मतदारसंघात पोहचायचे आहे. मी त्यांना म्हटलं अरे थांबा, तुम्हाला छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे पाहून निवडून दिलंय. पण ते निघून गेले, त्या पाठोपाठ तुमचे आमदार ही उठले. बाहेर जाऊन यांनी वेगळंच सुरू केलं.
तुमच्या आमदाराने खासगी कारखाना व्यवस्थित चालवला, पण तुमच्या हक्काच्या कारखान्याची माती केली. तुम्ही म्हणाल, आता काय बोलताय, आधी मतं तुम्हीच द्यायला लावली. अरे हो की बाबा झाली चूक, मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल. लोकसभेसाठी माणसातला माणूस उभा करणार आहे. तुम्ही एकदिलाने काम करा आणि त्या उमेदवाराला निवडून द्या, असे अजित पवार यांनी अशोक पवार यांचे नाव न घेता सांगितले. कारखाने चालू करायला सहकार खात्याची परवानगी लागते तिथे आपले दिलीप वळसे पाटील आहेत. अर्थ खात्याकडून परवानगी घेवू तिथं मी असणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याला मदत करतील, असे अजित पवार यांनी सांगितले.