पुणे | 28 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीवेळी नाशिकच्या पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून चांगल्याच नाट्यमय घडामोडी घडून आलेल्या बघायला मिळाल्या होत्या. या निवडणुकीत नाशिकच्या जागेसाठी काँग्रेसकडून तत्कालीन आमदार सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी देण्याचं ठरलं होतं. या निवडणुकीत सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी लढवली होती. सत्यजित तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणामुळे तांबे आणि थोरात कुटुंबात गृहकलक झाल्याची चर्चा होती.
विशेष म्हणजे याच प्रकरणामुळे महाराष्ट्रात काँग्रेसमधील दोन गटांमधील संघर्ष चव्हाट्यावर आला होता. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी लढवली होती आणि ते जिंकूनही आले होते. या निवडणुकीत भाजपचा सत्यजित तांबे यांना छुपा पाठिंबा असल्याचीदेखील चर्चा होती. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात सत्यजित तांबे यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे सत्यजित तांबे भाजप पक्षात प्रवेश करू शकतात, अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण पुढे तसं काही घडलं नाही.
या सर्व घडामोडी घडून आता बराच काळ लोटलाय. आगामी काळात लोकसभा आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याशिवाय राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधील महापालिका निवडणुकांचं बिगूल कधीही वाजू शकतं. यामध्ये पुणे महापालिकेचा देखील समावेश आहे. असं असताना पुण्यात आज एक अनोखं राजकीय बॅनर बघायला मिळालं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार आणि सत्यजीत तांबे यांचे एकत्रित बॅनर बघायला मिळाले आहेत. या दोन्ही नेत्यांना वाढदिवसाच्या एकत्रित शुभेच्छा देणारं हे बॅनर लावण्यात आलं आहे. संबंधित बॅनर पुण्याच्या हडपसर भागात लागले आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचादेखील फोटो बघायला मिळाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी काही नवी राजकीय समीकरणांची तर ही नांदी नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.