‘मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही’, आमदार सुनील टिंगरे यांचं पुण्यातील अपघाताच्या घटनेवर स्पष्टीकरण

| Updated on: May 20, 2024 | 10:08 PM

"माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती काल पहाटे तीन वाजेच्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करुन दिली. तसेच माझे परिचित विशाल आगरवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं. त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलिस ठाण्यात गेलो", असं सुनील टिंगरे म्हणाले.

मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही, आमदार सुनील टिंगरे यांचं पुण्यातील अपघाताच्या घटनेवर स्पष्टीकरण
आमदार सुनील टिंगरे यांचं पुण्यातील अपघाताच्या घटनेवर सविस्तर स्पष्टीकरण
Follow us on

पुण्यात झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेशी आपला कोणताही संबंध नसताना आपलं नाव जोडलं जात असल्याची खंत टिंगरे यांनी व्यक्त केली. तसेच सुनील टिंगरे यांनी घटनेनंतर आपण घटनास्थळी का गेलो होतो? याचा खुलासा केला. सुनील टिंगरे यांनी ट्विट करत आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. “कल्याणीनगरमध्ये काल रात्री झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल, असा मला विश्वासही आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी आशा बाळगतो”, असं सुनील टिंगरे म्हणाले.

“या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना कालपासून सोशल मीडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. याबाबत सुरवातीला दुर्लक्ष केलं. परंतु विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात आल्याने कालच्या घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे”, असं सुनील टिंगरे म्हणाले.

“माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती काल पहाटे तीन वाजेच्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करुन दिली. तसेच माझे परिचित विशाल आगरवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं. त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलिस ठाण्यात गेलो. यावेळी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता पोलीस निरक्षक हे अपघातातील तरुण-तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं. मी त्यांना फोन केला असता १५ मिनिटात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार ते आलेही”, असं सुनील टिंगरे यांनी सांगितलं.

‘मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही’

“पोलीस स्टेशनला आल्यानंतर पीआय साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो. मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही हे पोलीस अधिकारीही कबूल करतील, यात शंका नाही. म्हणूनच काल सकाळी ६ वाजता याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियाही झाली”, असं टिंगरे म्हणाले.

“दरम्यान, या अपघातप्रकरणी मी पोलिसांवर दबाव आणल्याचा खोडसाळपणा काही घटकांकडून सोशल मिडियात केला जातोय. यामुळं माझी सार्वजनिक आणि राजकीय जीवनात बदनामी होण्याची शक्यता असल्याने वस्तुस्थिती याठिकाणी नमूद केली आहे. वास्तविक मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात आहे आणि याबाबत वेळोवेळी आवाजही उठवला आहे. विमाननगर, कल्याणीनगर, खराडी या उच्चभ्रू भागात रात्री उशिरापर्यंत अवैधरित्या सुरु असलेले पब, बार आणि टेरेस हॉटेल तसंच दारु विक्री, मटका धंदा, हुक्का पार्लर, पत्त्याचे क्लब, अंमली पदार्थांची विक्री, मसाज पार्लर या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मी पोलीस आयुक्तांना यापूर्वी पत्रही दिलं आहे आणि विधानसभेतही यासंदर्भात आवाज उठवला आहे”, असंही ते म्हणाले.

कल्याणीनगरमधील रहिवाशांसोबत पोलीस आयुक्त साहेबांची प्रत्यक्ष भेट घेउनही त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला आहे. शिवाय यापुढेही या अवैध व्यवसायांना माझा नेहमीच विरोध असेल. पण एखाद्या अपघाताशी कोणताही संबंध नसताना नाव जोडणं हे चुकीचं आणि बदनामीकारक आहे. सूज्ञ नागरीक या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत”, असा विश्वास सुनील टिंगरे यांनी व्यक्त केला.