पुणे | 25 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाली होती. या गुप्त बैठकीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना आज पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी आज सकाळीच माध्यमांना प्रतिक्रिया देताना अजित पवार हे आमचे नेते असल्याचं वक्तव्य केलं होतं. नंतर दोघांनी आपल्या वक्तव्यावर घुमजाव केलं. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे आपले भाऊ असल्याचं म्हणत गुप्त बैठकीच्या प्रश्नावर महत्त्वाचं वक्तव्य केलं.
“आम्ही वेगळी भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचं पाऊल उचललं आहे. आम्ही विधानसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेच्या अध्यक्षांना याबाबतचं पत्र पाठवलेलं आहे. आम्ही अजूनही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही फूट नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाच्या स्थापनेपासून अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत”, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलीही फूट नाही. आमच्या पक्षाच्या 9 आमदार आणि 2 खासदारांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्यांना जी काही नोटीस पाठवायची ती पाठवलेली आहे. आम्ही त्यांच्या स्पष्टीकरणाची वाट पाहतोय”, असं सुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
“अजित पवार यांच्यासोबत गुप्त बैठक मी तरी घेतलेली नाही. मला भावाला भेटायला सिक्रेट मिटींग करायची गरज नाही. आम्ही पारदर्शकपणे जगतो. या लोकशाहीत लपवायचं तरी काय?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. “मी भाजपच्या किती लोकांना दिल्लीत भेटते, मी त्यांना लपून थोडी भेटते. उघडपणे भेटते. विरोधक माझा शत्रू आहे, असे माझ्यावर झालेले संस्कार नाहीत. आमचे विरोधकांसोबत, भाजपसोबत वैचारिक लढाई आहे. आमची वैयक्तिक लढाई कुणाहीसोबत नाही”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
“आम्ही कायदेशीर कारवाईसाठी प्रकियेने जाणारे लोकं आहोत. त्यामुळे आम्ही योग्य प्रकियेने जातोय”, असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी सुप्रिया सुळे यांना एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार यांच्यासाठी परतीचे दरवाजे खुले आहेत का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली.
“एकतर मला तो अधिकार नाही. मी पक्षामधील एक खूप लहान कार्यकर्ती आहे. मी एक खासदार आहे तोपर्यंत मी माझ्या जबाबदारी करतेय. वर्किंग प्रेसिडेंट म्हणून माझे बॉस शरद पवार आहेत. कारण ते पक्षाचे देशाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सकाळी एक स्टेटमेंट केलेलं आहे. एकदा आपल्या पेक्षा मोठ्या नेत्याने एक स्टेटमेंट केलं असेल तर बॉस इज अलवेज राईट”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
यावेळी सुप्रिया सुळे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुळे यांनी बावनकुळे यांना टोला लगावला. “मला वाबनकुळे यांचे मन:पूर्वक आभार मानायचे आहेत. त्यांच्याकडे 303 खासदार आहेत, त्यांच्याकडे 200 आमदार आहेत. याचा अर्थ शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात काहीतरी खासियत असली पाहिजे ना, 300 खासदार आणि 200 आमदार असले तरी त्यांना आम्ही हवेहवेसे वाटत आहोत”, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
अजित पवार यांच्या गटावर कुठपर्यंत कारवाई करण्यात आली? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर “हा आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. याबद्दल आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील हेच व्यवस्थित सांगतील. संविधानाच्या चौकटीत ज्या गोष्टी आहे ते पाळू”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.