नवीद पठाण, सातारा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तो चार दिवसानंतर मागेही घेतला. यासंदर्भात दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं होते. ‘सामना’च्या अग्रलेखातून पहिल्यांदाच शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या उणीवा दाखवत टीका करण्यात आली. शरद पवार हे राजकीय वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा थेट हल्ला प्रथमच अग्रलेखातून करण्यात आला होता. शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरल्याचे म्हटले होते. आता या टीकेवर शरद पवार यांनी प्रथमच उत्तर दिले आहे.
काय म्हणाले शरद पवार
शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६४ वी पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, आम्ही काय केले हे संजय राऊत यांना माहिती नाही, हा आमच्या घरातील प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नेत्यांना संधी देऊन मंत्री केले आहे. आम्ही कुणाला संधी दिली आणि काय केलं हे जाहीर करत नाही, तसेच कोणी आमच्यावर टीका केली तरी आम्ही दुर्लक्ष करतो, अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांना फटकारले.
शिंदे यांना भाजपचा आदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपचा आदेश मान्य करावा लागतो. त्यामुळेच ते कर्नाटकात प्रचारासाठी गेले, असे विचारलेल्या एका प्रश्नावर शरद पवार यांनी उत्तर दिले. कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे आपण राजीनामा मागे घेतला. आता अधिक जोमाने काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटक निवडणूक प्रचारावर भाष्य
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय बजरंगबली म्हणत मतदान करण्याचे आवाहन प्रचारसभेतून केले होते. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, आमचा लोकशाही व धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे. लोकप्रतिनिधी म्हणून अशी शपथ घेतली जाते. पण या शपथेचा विसर देशाच्या पंतप्रधानांना झाला आहे.