बारामती (पुणे) : केंद्र सरकारने दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर देशवासियांना जरासा दिलासा दिला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 5 रुपयांची कपात करुन महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या जनतेला काहीअंशी का होईना दिलासा मिळाला. केंद्राने पेट्रोल डिझेलवर अबकारी कर कमी केल्यानंतर आता राज्य शासन दरकपात करण्यासाठी काही पावलं उचलणार का?, असा सवाल महाराष्ट्रातील भाजप नेते विचारत होते. त्यांच्या प्रश्नाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी केली आहे. राज्य सरकार दरवाढ कमी करणार का? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्याबाबत राज्य सरकारशी बोलावं लागेल. नागरिकांना दिलासा देण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. पण केंद्राकडे राज्याचं जीएसटीचं देणं आहे ते केंद्राने द्यावं. त्यामुळे लोकांना मदत करणारा निर्णय घेणं राज्य सरकारला शक्य होईल, असं पवार म्हणाले. म्हणजेच ‘जीएसटीचे पैसे द्या निर्णय घेऊ’ एवढ्या 5 शब्दात पवारांनी दरकपातीचा निकाल लावला.
केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केल्यानंतर देशभरातील विविध सरकारांनी देखील विविध कर कमी करुन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्र सरकारने अद्याप असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. याच पार्श्वभूमीवर फडणवीस, चंद्रकांतदादा-दरेकर यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्राने केंद्राचं काम केलं, आता राज्य सरकारनेही जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली. त्याच अनुषंगाने आज पवारांना दरकपातीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड घसरल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $85 वरून $81 प्रति बॅरलपर्यंत घसरली आहे. गेल्या ४८ तासांत कच्चे तेल 5 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या यापुढेही इंधनाचे दर कमी करतील का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, जाणकारांच्या अंदाजानुसार तुर्तास तरी इंधन दरकपातीची शक्यता अवघड वाटत आहे. क्रूड उत्पादक देशांची संघटना OPEC+ च्या बैठकीत क्रुडचा पुरवठा हळूहळू वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिवाळीनिमित्त केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनतेला मोठं गिफ्ट दिलंय. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केलीय. या कपातीनंतर आता देशात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी होणार आहेत. बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होतील. सध्या देशात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी 100 रुपयांचा टप्पा ओलांडलाय. या कपातीनंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून, महागाईचा प्रभावही कमी होणार आहे.
हे ही वाचा :
अरे काही तरी चांगलं बोला; ईडी, आयकराच्या चौकशीवर शरद पवार यांचं सूचक मौन